कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात दोन दिवसात तीन तास कामकाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

बेळगाव - कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुन बेळगावात सोमवारपासून (ता. 13) सुरु झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांत विधानसभेचे केवळ तीन तास कामकाज चालले. विकासावर चर्चा नाही की विषयपत्रिकेनुसार कामकाज होत नाही, अशी स्थिती आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या टोकाच्या भुमिकेमुळे सभागृहाचे कामकाज सातत्याने तहकूब ठेवावे लागले आहे. 

बेळगाव - कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुन बेळगावात सोमवारपासून (ता. 13) सुरु झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांत विधानसभेचे केवळ तीन तास कामकाज चालले. विकासावर चर्चा नाही की विषयपत्रिकेनुसार कामकाज होत नाही, अशी स्थिती आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या टोकाच्या भुमिकेमुळे सभागृहाचे कामकाज सातत्याने तहकूब ठेवावे लागले आहे. 

पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता कामकाज सुरु झाले. पण, ते दुपारी एकपर्यंत चालले. मंगळवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता कामकाज सुरु होऊन दुपारी 12 पर्यंत चालले. दोन दिवसांत केवळ तीन तास विधानसभेचे कामकाज चालले आहे. अधिवेशनासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सभागृहात मांडून त्यावर निर्णय अपेक्षित असतो. पण, पण, दरवर्षी बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अपेक्षांची पूर्तता होत नाही. यंदाही तोच कित्ता गिरवला जात आहे. 

सोमवारी सकाळी कामकाज सुरु झाल्यानंतर दिवंगत नेत्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांच्या योगदानाचा आढावा घेतल्यानंतर दुपारी 1 वाजता कामकाज तहकूब झाले. मंगळवारी सकाळी 11 वाजता कामकाज सुरु झाले. प्रश्‍नोत्तरांचा तास झाल्यानंतर डीवायएसपी गणपती यांच्या आत्महत्येचा विषय विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर यांनी मांडला. गणपती यांचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यात बंगळूर नगरविकास मंत्री के. जे. जॉर्ज यांच्यावर संशय आहे. जॉर्ज यांच्याविरुध्द गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राजीनाम्याची मागणी करणे जरुरी होते. पण, तसे घडले नाही, अशी टीका शेट्टर यांनी केली. 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या व कायदा मंत्री टी. बी. जयचंद्र यांनी श्री. शेट्टर यांच्या मागणीला विरोध दर्शविला. गणपती मृत्यू प्रकरणी सरकार गंभीर आहे. तपास यंत्रणेला सहकार्य दिले जात आहे. त्यामुळे, जॉर्ज यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. उभय नेत्यांत शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे, संतप्त विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनापुढे निदर्शने केली. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे, अध्यक्ष के. बी. कोळीवाड यांनी कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले. दुपारी साडेतीन वाजता कामकाज सुरु झाले. पण, विरोधकांनी निदर्शने कायम ठेवल्याने सभापतींनी कामकाज बुधवारपर्यंत (ता. 15) तहकूब केल्याने विधानसभेत एकाही महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होऊ शकली नाही. 

Web Title: Belgaum News Karanataka Legislative assembly report