सत्तेचा सारथी ठरवणार उत्तर कर्नाटक

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 17 एप्रिल 2018

‘कर्नाटकातील सत्तेचा रथ कोणाचा अन्‌ सारथी कोण? हे महिन्याने स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस की त्रिशंकू? असे प्रश्‍न सध्या रूंजी घालताहेत. सत्ता कोणाची येणार आणि मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. उत्तर कर्नाटकातील बारा जिल्ह्यांतील ९६ पैकी ज्या पक्षाच्या वाट्याला ५० हून अधिक जागा त्या पक्षाची सत्ता अन्‌ मुख्यमंत्री, असे इतिहास सांगतो. त्यामुळे सत्तेचा रथ अन्‌ त्याचा सारथी ठरविणारा मार्ग हा उत्तर कर्नाटकातून जातो, हे निश्‍चित. 

दक्षिणेतील दिग्विजय संपादन करण्यासाठी भाजपने येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे पुढील मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील की नाही हे माहीत नसले तरी सध्या त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढविल्या जात आहेत. आपणच किंगमेकर असे जाहीर आव्हान देत सत्तेसाठी रिंगणात उतरलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने कुमारस्वामी यांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे दावेदार राज्याकडे लक्ष देतानाच उत्तर कर्नाटकाकडे देखील लक्ष ठेवून आहेत.

राज्यात सत्ता कोणाची येणार, हे ठरविण्यात उत्तर कर्नाटक नेहमीच आघाडीवर राहिले आहे, हे गेल्या ४० वर्षांतील राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होते. २२४ पैकी ९० हून अधिक आमदार हे बेळगाव, बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, रायचूर, धारवाड, गदग, हावेरी, कारवार, कोप्पळ आणि बळ्ळारी जिल्ह्याचा काही भाग असलेल्या ठिकाणाहून निवडून जातात.

उत्तर कर्नाटकातून मिळालेल्या जागा व तत्कालीन मुख्यमंत्री 

  • वर्ष    जागा    मुख्यमंत्री
  • १९८५    ६०    रामकृष्ण हेगडे (जनता पक्ष) 
  • १९८९    ६८    वीरेंद्र पाटील (काँग्रेस) 
  • १९९९    ६०    एस. एम. कृष्णा (काँग्रेस) 
  • २००८    ५६    येडियुराप्पा (भाजप) 
  • २०१३    ५३    सिद्धरामय्या (काँग्रेस)
     

उत्तर कर्नाटकचे नेतृत्व करणारे दुखावले जाऊ नयेत, याची सर्वच पक्ष आणि त्यांचे हायकमांड नेहमीच काळजी घेतात. कारण, सत्तेची शिडी आणि मुख्यमंत्रीपदाची पदाची माळ गळ्यात पडण्यासाठी उत्तर कर्नाटकाशिवाय पर्याय नाही. काही निवडणुकांच्या इतिहासावर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते. १९८५ च्या निवडणुकीत तत्कालीन जनता दलाला ६० जागा उत्तर कर्नाटकने दिल्या आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

पुढे १९८९ मध्ये काँग्रेसला ६८ जागा फक्त उत्तर कर्नाटकातून मिळाल्या आणि काँग्रेसचे विरेंद्र पाटील मुख्यमंत्री बनले. १९९४ मध्ये उत्तर कर्नाटकातून काँग्रेसचा धुव्वा उडाला अन्‌ अवघ्या २२ जागा पदरात पडल्या. त्यावेळी संयुक्त जनता दलाचे सरकार सत्तेत आले आणि एच. डी. देवेगौडा व जे. एच. पटेल हे दोघे आलटून पालटून मुख्यमंत्री बनले. १९९९ मध्ये उत्तर कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारून ६० जागा जिंकल्या. उत्तर कर्नाटकातील जागांनी काँग्रेसला तारले आणि एस. एम. कृष्णा सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी टिकले. 

अन्‌ खिचडी सरकार अस्तित्वात 

उत्तर कर्नाटकातून ज्या पक्षाला ५० हून अधिक जागा मिळतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि तो टिकतोही हे पुन्हा एकदा २००४ च्या निवडणुकीत स्पष्ट झाले. त्यावेळी ७९ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. या पक्षाला उत्तर कर्नाटकातून सर्वाधिक ४१ जागा मिळाल्या. परंतु, भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. तेव्हा काँग्रेस-धजदची आघाडी होऊन काँग्रेसचे एन. धर्मसिंग मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

ही युती अवघी दोन वर्षे टिकली. त्यानंतर देवेगौडा पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांनी बंड करत काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला आणि भाजपच्या पाठिंब्यावर स्वतः मुख्यमंत्री बनले. धजद व भाजपचा प्रत्येकी २० महिने मुख्यमंत्री या तत्त्वावर झालेली ही युती कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याने तुटली आणि दोन्ही खिचडी सरकारे चार वर्षात संपुष्टात आली. नोव्हेंबर २००७ ते मे २००८ या काळात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

२००८ च्या निवडणुकीत येडियुराप्पांना राज्यभरातून सहानुभूती मिळाली आणि ते ११० जागा जिंकून मुख्यमंत्री बनले. यावेळी भाजपच्या पदरात उत्तर कर्नाटकातून तब्बल ५६ आमदार होते. मुख्यमंत्रीपदी असलेल्या येडियुराप्पांना वेळोवेळी विरोध झाला आणि राज्याने तीन मुख्यमंत्री पाहिले. परंतु, पाच वर्षे भाजपचे सरकार टिकले. गत २०१३ च्या निवडणुकीत भाजपची अनेक शकले झाल्याने काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आणि उत्तर कर्नाटकने काँग्रेसच्या पदरात ५६ आमदार टाकले. त्यामुळे काँग्रेसचे सरकार मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील पाच वर्षे टिकले. 

Web Title: Belgaum News Karantaka Assembly Election special