कर्नाटक निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बेळगाव - दोन विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी होण्याची शक्‍यता असून, आज (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता आहे.

बेळगाव - दोन विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी होण्याची शक्‍यता असून, आज (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता आहे.

सीमाभागातील मराठी टिकविण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात सीमालढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा. याबाबत नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, यासाठी (कै.) सुरेश हुंदरे स्मृती मंच व काही युवकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामान्य माणसांचीही तीच भावना होती. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना अखेर यश मिळण्याची शक्‍यता आहे.

लोकांनी आवाहन करूनही बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात समितीच्या दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकेका मतदारसंघात चार ते पाच उमेदवार उभे आहेत. शुक्रवारी (ता. २७) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, शुक्रवारी काय होतेय याकडे लोकांचे लक्ष लागून असतानाच दोन विधानसभा मतदारसंघात समितीचा एकच उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगू लागली आहे. या बातमीचे समिती कार्यकर्त्यांत स्वागत होत असून सर्वच मतदारसंघात एकेकच उमेदवार द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यावर आता शुक्रवारीच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी काहींनी शुक्रवारी सकाळपासून तीन ते चार बैठकांचे आयोजन केले आहे.

नगरसेवक रावळ राजीनामा देणार...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांत एकी होत नसल्यामुळे नगरसेवक दिनेश रावळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. २७) ते राजीनामा देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. रावळ हे प्रभाग क्र. १४ चे नगरसेवक आहेत. मराठी भाषिकांनी त्यांना निवडून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतदारसंघातून एकच मराठी उमेदवार हवा, अशी त्यांची भूमिका आहे. पण, समितीच्या दोन्ही गटांत अजून एकमत झालेले नाही. यामुळेच रावळ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election