महाराष्ट्र एकिकरण समितीचा झेंडा फडकवा - प्रा. डॉ. एन. डी. पाटील
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आता विश्रांती न घेता, समितीला विजयी करा, असे भावनिक आवाहन सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

म. ए. समितीचे बेळगाव दक्षिणमधील उमेदवार प्रकाश मरगाळे, बेळगाव ग्रामीणमधील उमेदवार मनोहर किणेकर यांच्या प्रचार कार्यालयांचे शनिवारी (ता. २८) उद्घाटन करून ते बोलत होते. ते म्हणाले, म. ए. समिती एका ध्येयाने वाटचाल करत आली आहे. प्रदीर्घ काळ चाललेला सीमालढा हा जगाच्या पाठीवर एकमेव आहे. आज निवडणुकांत पैशांचे राजकारण सुरू झाले आहे. पण, अशा आमिषांना कोणीही बधू नका. लढा अस्मितेचा आहे. त्याच्यासमोर पैसा नगण्य असून आपल्या अस्तित्वासाठी आपण सारेच समितीचे उमेदवार या भावनेतून लढा देऊया आणि समितीचा विजय खेचून आणुया, असे त्यांनी सांगितले.
मराठी लोकांत बुध्दीभेद करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. असत्याचा पराभव करणे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे.
- ॲड. किसन येळ्ळूरकर, ज्येष्ठ नेते
यावेळी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, शिवाजी हावळाणाचे, नगरसेवक दिनेश रावळ, ॲड. धनराज गवळी, अर्जुन गोरल, रावजी पाटील, प्रा. आनंद मेणसे, यल्लाप्पा रेमाणाचे, परशराम मोटराचे, राजू पाटील, गुणवंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेला माजी पणन संचालक दिनेश ओऊळकर, सुभाष ओऊळकर, नारायण खांडेकर, ॲड. राजाभाऊ पाटील उपस्थित होते.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र एकिकरण समितीची उमेदवार निवड परंपरागत प्रक्रियेतूनच झालेली आहे. त्याला प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही मान्यता दिली आहे. तरीही लोकांत दिशाभूल करण्यासाठी शरद पवारांनी मला फोन केला, अहवाल मागविला अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. अशा प्रकारांना खतपाणी न घालता म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे यांच्यासोबत राहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.
त्या चौघांचे योगदान काय?
म. ए. समितीच्या कार्यासाठी प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर, अरविंद पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. समितीचा कोणताही लढा, मेळावा असो किंवा सर्वोच्च न्यायालयातील कामकाज असो, त्यात यांचे योगदान राहिले आहे. यांच्याविरोधात असणाऱ्या त्या चौघांचे योगदान तपासून पाहावे किंवा त्या उमेदवारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनीही त्यांचे योगदान सांगावे, असे आवाहन मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.