काँग्रेस सरकारचे साठ वर्षातील काम भाजपकडून पाच वर्षात - नितीन गडकरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

खानापूर - कॉंग्रेस सरकारने गेल्या साठ वर्षात जे केले नाही ते केंद्रातील भाजप सरकारने पाच वर्षात करुन दाखविले आहे. तालुक्‍यातील सुपीक जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी भविष्यात पाटबंधारे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले असून पिरनवाडी ते गोवा सीमेपर्यंतच्या महामार्ग विकासासाठी दोन हजार कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

खानापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारार्थ मंत्री गडकरी यांची सोमवारी (ता. 30) खानापुरातील मलप्रभा क्रीडांगणावर जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. उदेमवार हलगेकर अध्यक्षस्थानी होते. तालुका भाजपाध्यक्ष विठ्ठल पाटील, प्रमोद कोचेरी, वल्लभ गुणाजी, उज्ज्वल्ला बडवाण्णाचे, किरण येळ्ळुरकर, बाबुराव देसाई, वसंत देसाई, मारुती पाटील, सुरेश देसाई, संजय कुबल व्यासपीठावर होते. 

ते पुढे म्हणाले, देशात रोगराईमुळे नव्हे तर अपघातांमुळे अधिक मृत्यू होत आहेत. खराब रस्ते हे त्यामागचे कारण आहे. हा धोका कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रस्त्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तसेच पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि कृषी विकासासाठी सरकार वचनबध्द आहे. पंतप्रधान मोदी यांनी "सबका साथ सबका विकास' यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यात भाजप सरकार असताना शेतीसाठी पाटबंधारे प्रकल्प, ग्रामीण सडक योजनेतून रस्ते, कृषी क्षेत्रासाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. पण, कॉंग्रेसच्या कार्यकाळात विकास ठप्प झाला आहे. आता पुन्हा विकास करण्याची संधी तुमच्या दारापर्यंत चालून आली आहे. त्यासाठी भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर इतर नेत्यांचीही भाषणे झाली. श्री. हलगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election