मंगळूर जिल्‍ह्यात काँग्रेसची समीकरणे बिघडण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेल्या या जिल्ह्यातील सर्व जागा कायम राखण्याचा काँग्रेसला विश्‍वास आहे, तर मोदींच्या सभेमुळे ही समीकरणे बिघडू शकतात, अशी भीती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते.

मंगळूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या पाच मे रोजी येथे होत असून, त्यामुळे मंगळूर जिल्ह्यातील काँग्रेसची समीकरणे बिघडण्याची शक्‍यता आहे. जातीय ध्रुवीकरणासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेल्या या जिल्ह्यातील सर्व जागा कायम राखण्याचा काँग्रेसला विश्‍वास आहे, तर मोदींच्या सभेमुळे ही समीकरणे बिघडू शकतात, अशी भीती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते. उमेदवारीवरून पक्षात धुसफूस असल्याचे एक कारणही आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसच्या विजयासाठी घरोघर जाऊन प्रचारावर भर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, असेही स्थानिक नेते सांगतात.

‘विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत मोदींच्या सभांचा फारसा परिणाम येथे झाला नव्हता. पण आता ते पंतप्रधान म्हणून येथे येत असल्यामुळे काही तरी परिणाम नक्कीच होईल. पाच ते दहा टक्के फरक पडू शकतो,’ असे मत काँग्रेसचे मंगळूरचे उमेदवार आणि अन्नमंत्री यू. के. कादर यांनी सांगितले. 

यंदा ते चौथ्यांदा रिंगणात आहेत. २०१३ च्या निवडणुकीत तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी येथे प्रचार केला होता, पण भाजपला एकच जागा मिळाली होती. काँग्रेसने सात जागा जिंकल्या होत्या. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाळ, मंगळूर आणि मंगळूर उत्तर हे मतदारसंघ जातीय तणावांसाठी 
कुप्रसिद्ध आहेत.

बंटवाळचे काँग्रेस उमेदवार आणि राज्याचे वन मंत्री रामनाथ पै यांना मात्र कर्नाटकमध्ये मोदी लाट नसल्याचे वाटते. ते येथून आठव्यांदा रिंगणात आहेत. मोदींनी फक्त खोटी आश्‍वासने दिली आहेत, त्यांची योग्यता मतदारांना माहिती आहे, असे ते 
म्हणाले.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election