कर्नाटकात भाजपच्या 50 नेत्यांची मांदियाळी

संजय उपाध्ये
शुक्रवार, 11 मे 2018

देशभरात केवळ कर्नाटकातच सार्वजनिक निवडणुका सुरू असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांची राज्यात मांदियाळी दाखल झाली होती. या नेत्यांनी सारा कर्नाटक ढवळून काढला आहे. गुरूवारी जाहीर प्रचाराची सांगता झाल्याने सर्व नेते आता आपआपल्या क्षेत्राकडे रवाना झाले आहेत.

कर्नाटकात गेला पंधरवडाभर सुरू असलेला प्रचाराचा धुरळा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता खाली बसला. जाहीर प्रचार, रॅली, मिरवणुका, कोपरासभा, भाषणे, आरोप-प्रत्यारोप आणि हेवेदावे संपले. अनेक नेत्यांनी आपल्या अमोघ वाणीने आपल्या पक्षाचा अजेंडा राबविला.

कोणत्याही परिस्थितीत भारत काँग्रेसमुक्त करायचा हे भूत सवार झालेल्या भाजप नेत्यांनी तडक कर्नाटक गाठले आणि काँग्रेसला पर्यायाने राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले. दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य म्हणजे कर्नाटक. भाजपने मागील निवडणुकीत सत्तेची चव चाखली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्या आशा वाढल्या होत्या. सत्ता नसली तरी निदान सत्तेजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर गोळाबेरीज करत सत्ता स्थापायची हा ‘फॉर्म्युला’ पक्षश्रेष्ठींनी वापरला आहे. त्यासाठी भाजपने पक्षातील ज्येष्ठ अशा ५० नेत्यांना कर्नाटक मोहिमेवर पाठविले आहे. अगदी पंतप्रधान, पक्षाध्यक्ष यांचाही अपवाद नाही. 

त्याशिवाय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, प्रकाश जावडेकर, अनंतकुमार, डी. व्ही. सदानंद गौडा, पियुष गोयल, अनुराग ठाकुर, कृष्णपाल गुज्जर, संतोष गंगवार यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. ५० ठिकाणी रोड शो घेतले. त्यांच्या जोडीला रमण सिंग आणि शिवराजसिंग चौहान, योगी आदित्यनाथ हेही होते. 

सिद्धरामय्या लढवत असलेल्या बदामी मतदारसंघात अमित शहा यांच्या रोड शोने भाजपने प्रचाराची सांगता केली. काँग्रेसच्या प्रचाराची मदार स्वतः राहुल गांधी यांनी उचलली. त्यांच्या सोबतीला मल्लिकार्जुन खर्गे आणि डॉ. जी. परमेश्‍वर उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेतेच स्थानिक उमेदवारांचा प्रचार करताना दिसत होते. उत्तर कर्नाटकात काही ठिकाणी एमआयएमचे नेते ओवेसी यांनीही सभा घेतल्या. विशेष म्हणजे त्यांनी येथे धजदला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election