बेळगाव जिल्ह्यात दहा विद्यमान आमदारांचा पराभव 

अक्षय सबनीस 
मंगळवार, 15 मे 2018

जिल्ह्यात यावेळी काही मतदारसंघात अनपेक्षित आणि धक्‍कादायक निकाल लागले आहेत. भाजपने दहा जागा जिंकून आपले अस्तित्व अबाधित ठेवले असले तरी कॉंग्रेसनेही दोन जागा अधिक घेत आठ जागांवर विजय मिळविला आहे. मात्र, कॉंग्रेस आणि भाजपच्या काही बालेकिल्ल्यांना मतदारांनी सुरुंग लावला आहे. 

बेळगाव  - 2013 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला 8, केजेपी व बीएसआर कॉंग्रेसला प्रत्येकी एक , काँग्रेसला 6 तर महाराष्ट्र एकिकरण समितीला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विरोधात लढलेले केजेपी आणि बीएसआर कॉंग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये सामील होते. त्यामुळे, भाजपचे जिल्ह्यातील संख्याबळ 10 झाले होते.

या निवडणुकीतही भाजपला जिल्ह्यात दहाच जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजपचे माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना कॉंग्रेसच्या महेश कुमठळ्ळी यांनी पराभवाची धूळ चारली. कागवाडमध्ये कॉंग्रेसच्या श्रीमंत पाटील यांनी राजू कागे यांना पराभवाचा धक्‍का दिला. तर बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अॅड. अनिल बेनके यांनी कॉंग्रेसच्या फिरोज सेठ यांची सत्ता खालसा केली. कित्तूर मतदारसंघातील कॉंग्रेसच्या डी. बी. इनामदार यांना भाजपच्या महांतेश दोड्डगौड्डर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. 

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून कॉंग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर व खानापुरातून डॉ. अंजली निंबाळकर या दोन महिला पहिल्यांदाच विधानसभेत गेल्या आहेत. गेल्यावेळी बेळगाव दक्षिण व खानापूर मतदारसंघात विजयश्री खेचून आणलेल्या म. ए. समितीला यावेळी बेकीचा फटका बसला. या दोन्हीही जागा समितीच्या हातून निसटल्या असून कॉंग्रेस आणि भाजपने विजय संपादन केला आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी एकमेकांसमोर तगडे आव्हान निर्माण केल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. 

महिला आमदारांत वाढ 
2013 च्या निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून शशिकला जोल्ले या एकमेव महिला विजयी झाल्या होत्या. यावेळी सौ. जोल्लेंसह लक्ष्मी हेब्बाळकर आणि डॉ. अंजली निंबाळकर या तीन महिला जिल्ह्यातून विधानसभेत गेल्या आहेत. त्यामुळे यंदा महिला मतदारांचा टक्‍का वाढण्याबरोबरच महिला आमदारांचीही संख्या वाढली आहे. 

संख्याबळ दृष्टीक्षेपात 
पक्ष..........2013.............2018 
भाजप........06................10 
कॉंग्रेस.......06.................08 
म. ए. समिती...02...........00 
केजेपी........01................00 
बीएसआर कॉंग्रेस..01........00 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election