भाजपला रोखण्यात "नोटा'चा वाटा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

बेळगाव - बंगळूर शहरातील मतदानाची घटलेली टक्केवारी आणि "नोटा' यामुळे भाजपला 14 जागांवर फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून आठ आमदारांची आवश्‍यकता आहे. 

बेळगाव - बंगळूर शहरातील मतदानाची घटलेली टक्केवारी आणि "नोटा' यामुळे भाजपला 14 जागांवर फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून आठ आमदारांची आवश्‍यकता आहे. 

बंगळूर शहरातील मतदानाची टक्‍केवारी वाढली असती तर कदाचित बंगळूरमधील भाजपच्या जागा वाढल्या असत्या, असे पक्षाच्या प्रमुख नेत्यांना वाटते. बंगळूरबाहेरील आठ मतदारसंघांमध्ये "नोटा'चा फटका भाजपला बसला. भाजपचे उमेदवार तेथे अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्या फरकापेक्षा नोटाला झालेले मतदान जास्त आहे. त्यामुळे नोटाचा पर्याय नसता तर त्यातील काही मतदान भाजपच्या उमेदवारांना झाले असते व भाजप सत्तेपर्यंत पोहोचला असता, असेही या नेत्यांना वाटते. 

नोटामुळे भाजपच्या चांगल्या उमेदवारांचा पराभव झाला असाही एक मतप्रवाह निर्माण झाला आहे. देवर हिप्परगी मतदारसंघात धजदच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा केवळ 90 मतांनी पराभव केला आहे. तेथे नोटाला 935 इतके मतदान झाले आहे. गदग मतदारसंघात कॉंग्रेसचे माजी मंत्री एच. के. पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला 1868 मतांनी हरविले, तेथे नोटाला 2007 इतके मतदान झाले आहे. हिरेकेरूर मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला 555 मतांनी हरविले आहे. तेथे नोटाला 972 इतके मतदान झाले आहे.

कुंदगोळ मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवाराला 634 मतांनी हरविले आहे, तेथे नोटाला 1032 इतके मतदान झाले आहे. मस्की मतदारसंघात तर भाजपच्या उमेदवाराचा कॉंग्रेसकडून केवळ 213 मतांनी पराभव झाला आहे. येथे नोटाला 2049 इतके मतदान झाले आहे. याशिवाय बळ्ळारी, चामराजनगर, कंपली, श्रृंगेरी, विजयनगर, यल्लापूर, यमकनमर्डी या मतदारसंघांतही भाजपच्या उमेदवारांचा अत्यंत कमी मतफरकाने पराभव झाला आहे. तरल येथे नोटाला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात "नोटा'चा मोठा वाटा आहे. 

सिद्धरामय्या वाचले 
बदामी मतदारसंघात मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या 1696 मतांनी विजयी झाले, तर भाजपच्या श्रीरामुलू यांचा पराभव झाला. या मतदारसंघात नोटाला 2007 इतके मतदान झाले. अन्यथा चामुंडेश्‍वरी मतदारसंघाप्रमाणे बदामीतही सिद्धरामय्या यांचा पराभव झाला असता. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election