एन. डी. पाटील, नीतेश राणे, धनंजय मुंडेंची तोफ धडाडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

बेळगाव -  महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबरला आयोजित काळ्या दिनाला आणि १३ नोव्हेंबरच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. काळ्या दिनाला सीमालढ्याचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार नीतेश राणे येणार आहेत. तर महामेळाव्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सहभाग निश्‍चित झाला आहे. शिवाय महाराष्ट्रातून इतरही नेते येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह मराठीबहुल सीमाभाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ १९५६ पासून १ नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव हा सीमावासीयांचा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. सकाळी निषेध मूक सायकल फेरी आणि त्यानंतर जाहीर सभा असा असे त्याचे स्वरूप असते. सीमालढ्यातील अग्रणी नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील नेते या वेळी सीमावासीयांना मार्गदर्शन करत असतात. यंदाच्या काळ्या दिनाला एन. डी. पाटील यांच्यासह काँग्रेसचे युवा आमदार नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसा निरोप त्यांनी समिती नेत्यांना दिला आहे. 

नीतेश राणे यांनी अल्पावधीतच आपल्या भाषणांनी आणि कामांमुळे महाराष्ट्रात लौकिक मिळविला असून ते एक फायरब्रॅंड नेते म्हणून संबोधले जातात. यंदा १३ नोव्हेंबरला कर्नाटकाने बेळगावात हिवाळी विधिमंडळ अधिवेशन घेण्याचे जाहीर केले आहे. ज्या ज्या वेळी अधिवेशन होईल, त्या प्रत्येक वेळी महामेळावा घेऊन कर्नाटकाला प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी घोषणा समितीने पहिल्या महामेळाव्यात केली होती. त्यानुसार यंदाही मध्यवर्ती म. ए. समितीने महामेळाव्याची घोषणा केली आहे. या महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी समितीने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय १५ नेत्यांना पत्र पाठविले आहे. त्यापैकी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे. 

समितीसाठी कायपण...!
सीमालढ्याच्या सुरवातीपासून सक्रिय योगदान दिलेल्या ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना डॉक्‍टरांनी सक्‍तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा आणि काळादिन, महामेळाव्याच्या नियोजनबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी आपण काळ्यादिनाला येणार असल्याचे सांगितले. त्यातून त्यांनी समितीप्रती असलेली आत्मीयता दाखवून दिली.

Web Title: Belgaum News Maharashtra Karanatak Border Issue