घाबरलो होतो; तरीही दोघींना वाचविले !

घाबरलो होतो; तरीही दोघींना वाचविले !

बेळगाव - मुली बुडायला लागल्यानंतर आपण स्वत:च घाबरलो होतो. काय करावे सुचत नव्हते. त्यांना वाचविण्याची क्रिया उत्स्फूर्त होती. ती कुठून आली, याचेच आश्‍चर्य वाटते. केवळ तीन-चार मिनिटांचा हा थरार आजही आठवला तर अंगावर शहारे येतात, हे बोल आहेत तिलारी धरणाजवळील धबधब्यात बुडणाऱ्या दोन मुलींना वाचविणाऱ्या मनोज धामणेकरचे. ‘सकाळ’शी बोलताना त्याने तो थरारक अनुभव कथन केला.

तो म्हणाला, ‘‘धामणे गावात मित्रासमवेत गेलो होतो. दीडच्या सुमारास धबधब्याचे फोटो काढण्यासाठी गेलो. त्यावेळी तिथे नऊ युवतींचा गट आधीपासूनच होता. दोन युवक त्यांच्यासोबत होते. पाच मुली डोहात उतरल्या होत्या. दगडावर उभे राहून धबधब्याचे फोटो काढत होतो. त्याचवेळी युवतींच्या किंकाळ्यांनी भानावर आलो. पाहतो तर काय तीन मुली बुडत होत्या. क्षणाचाही विलंब न करता जॅकेट काढून पाण्यात उतरलो. दोन मुलींना केसांना धरुन बाहेर काढले. तेवढ्यात तिसरी मुलगी बुडाली. दोघींना काठावर सोडून तिला वाचविण्यासाठी गेलो. तोपर्यंत ती पाण्यात गडप झाली होती.’’

गढूळ पाण्यामुळे काहीच दिसत नव्हते. थोडा वेळ शोध घेतल्यानंतर बाहेर आलो. बाकीच्या मुलीही तिचा शोध घेण्याचा आग्रह करत होत्या. पण, काही उपयोग झाला नाही. आपण सर्व मुलींना घेऊन थेट धरणाच्या कार्यालयात आलो. तिथल्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

‘सकाळ’ अंक पोचवून शिक्षण
मनोज हा कुद्रेमानीतील गरीब घरातील असून त्याला वडील नाहीत. आई आहे. काही वर्षे तो गावात ‘सकाळ’चा अंक पोचवून शिक्षण घेत होता. सध्या शिनोळीतील ऑर्लिकॉन कंपनीत तो कंत्राटी कामगार आहे. त्या दिवशी रात्रपाळी असल्याने तो तिलारीला गेला. मुलाचे कर्तृत्व समजल्यानंतर आईने ‘तुला काही झालं असतं तर...’ अशी भाबडी काळजी व्यक्‍त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com