मराठी शाळा वाचविण्यासाठी मुचंडीत फुलतोय ‘ज्ञानांकुर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

बेळगाव - मुचंडीतील (ता. बेळगाव) मराठी शाळा वाचविण्यासाठी माजी विद्यार्थी व पालकांनी सुरु केलेल्या पूर्व प्राथमिक वर्गात ४२ विद्यार्थी दाखल झाले आहेत. सरकारी मराठी शाळेतच असलेल्या या वर्गात मराठी, कन्नड व इंग्रजी भाषांची ओळख करुन दिली जात आहे. इथून बाहेर पडणारे विद्यार्थी सरकारी मराठी शाळेत पहिलीत प्रवेश घेतील. त्यांना पाचवीपर्यंत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.

शाळेला ‘ज्ञानांकुर’ असे नाव दिले आहे. वाढते कन्नडीकरण व इंग्रजी माध्यमामुळे मराठी शाळेची पटसंख्या घटली. याची जाणीव होताच माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दर्जेदार शिक्षण देणारी पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्याशी बोलून मंजुरी घेतली. शाळेतीलच दोन खोल्या या पूर्व प्राथमिक वर्गांसाठी दिल्या. एलकेजीला २० तर युकेजीला २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांना शिकविण्यासाठी दोन डीएड पदविकाधारक शिक्षक व एक आयाची नियुक्ती केली आहे. त्यांना ज्ञानांकुरच्या माध्यमातूनच वेतन दिले जाते.

माजी विद्यार्थी व पालकांनी जमा केलेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य दिले आहे. एलकेजी वर्गात फायबरची बाके उपलब्ध करुन दिली आहेत. युकेजीसाठीही बाके दिली जाणार आहेत. ज्ञानांकुर शाळेचे संस्थापक पुंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली शाळा समिती स्थापन झाली आहे. 

समितीत अध्यक्ष संतोष चौगुले, उपाध्यक्ष सोनम भातकांडे, सचिव युवराज जोंधळे, उपसचिव विशाल गारगोटी, खजिनदार यल्लाप्पा भातकांडे, संचालक सुधीर कोळजीगौडा, लक्ष्मीकांत हुलीकोतली, रमेश देमाणे, बाळेशी चौगुले, कलावती मोटरे, अनिता मुतकेकर, मुख्याध्यापक रेवाणी मोदगेकर, शिवाजी भातकांडे, नारायण चौगुले, कृष्णा यल्लारे, कृष्णा कोळजीगौडा, अशोक घुत्ती, परशराम खेमणे यांची निवड झाली आहे.

सर्वसामान्य मुलांनाही शक्‍य
मुलांना खासगी इंग्रजी माध्यम शाळांसारखे शिक्षण मिळावे, असे सर्वच पालकांना वाटते. पण, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना हे शक्‍य नसते. गावातील काही पालकांनी आपल्या मुलांना बेळगावातील खासगी शाळांत प्रवेश घेतला. त्यासाठी कर्ज काढून पैसे भरले. पण आता त्यातील बहुतेक पालकांनी गावातील पूर्व प्राथमिक शाळेतील युकेजीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे.

Web Title: Belgaum News Marathi School Dnynakur in Muchandi