सर्वच वटवाघळांपासून "निपाह'चा धोका नाही -  आरोग्य खाते  

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 24 मे 2018

आपल्या भागातील झाडांवर वटवाघळे बसतात म्हटल्यानंतर त्याचा "निपाह'शी संबंध जोडणे चुकीचे आहे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

बेळगाव - हजारो वटवाघळांमध्ये जी वटवाघळे फळांचा रस खाऊन जगतात, त्यांनी खाल्लेली फळे जर एखादी व्यक्ती अथवा अन्य डुकराने खाल्ली तर निपाह विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. आपल्या भागातील झाडांवर वटवाघळे बसतात म्हटल्यानंतर त्याचा "निपाह'शी संबंध जोडणे चुकीचे आहे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. तरीही वटवाघळे असलेल्या भागात काही दिवस फिरणे टाळणेच योग्य होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

वटवाघळामुळे निपाह विषाणुचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शहरातील अनेक भागात भितीचे वातावरण आहे. विशेषतः मराठा मंदिर कार्यालयापासून गोवा वेस सर्कलपर्यंत सुमारे 20 हून अधिक झाडांवर वटवाघळांचे अस्तित्व आहे. हे वास्तव आजकालचे नसून गेल्या अनेक वर्षांपासून येथे वटवाघळे आहेत.

शिवाय व्हॅक्‍सीन डेपोसह ज्या परिसरात झाडे अधिक आहेत तेथे साधारणतः वटवाघळांचे अस्तित्व असतेच. परंतु, वटवाघळे आहेत म्हटल्यानंतर तेथे निपाह येईल, ही भिती चुकीची आहे. कारण, हजारो वटवाघळांमध्ये काही फळांचा रस खाऊन जगणारी वटवाघळे असतात. त्यांनी अर्धवट खाल्लेले फळ झाडाखाली पडल्यास ते कोणीतरी व्यक्तीने अथवा डुकराने खाल्ल्यास त्यातून निपाहचे विषाणु पसरू शकतात. 

नाहक भिती नको 

शहापूर, गोवावेस, व्हॉक्‍सीन डेपो, टिळकवाडीसह शहर परिसरातील काही झाडांवर वर्षानुवर्षे वटवाघळे आहेत. शिवाय जेथे त्यांचे वास्तव्य आहे, ती फळांची झाडेही नाहीत. वटवाघूळ जेव्हा फळ खाईल तेव्हा ते अन्यत्र जंगल भागातून खाऊन येईल आणि ते फळ शहरात येऊन पडण्याची शक्‍यता नाही. शिवाय वटवघाळेही ही दिवसा कधीही बाहेर पडत नाहीत. अन्नाच्या शोधात ती रात्रीच बाहेर पडतात. त्यामुळे परिसरात वटवाघळे आहेत म्हणून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या रोगाबाबत सध्या चर्चा असल्यामुळे तुम्हाला शंका असल्यास वटवाघळे लोंबकळणाऱ्या परिसरात काही दिवस फिरायला जाऊ नका, इतकेच त्यांचे म्हणणे आहे. 

आरोग्य खात्याने याबाबत पुरेपूर काळजी घेतलेली आहे. या रोगाचा सांसर्ग झालेला असल्यास अथवा नसल्यास 21 दिवसात स्पष्ट होणार आहे. आणखी पंधरा दिवस याबाबत संशयास्पद रूग्ण न आढळल्यास शहरात याचे रूग्ण नाहीत, हे स्पष्ट होणार आहे. वटवाघळे लोंबकळणाऱ्या झाडाखाली आंबे व अन्य फळे विक्रीही बंद करण्याची सूचना दिलेली आहे.

-  डॉ. आप्पासाहेब नरट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी 

Web Title: Belgaum News Nipah disease Health Department comment