निपाणीत 22 तोळ्याच्या दागिण्यांची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

निपाणी - येथील बेळगाव नाक्‍याशेजारी असलेल्या माने प्लॉटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये असा 7 लाख 54 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या घरात ही चोरी झाली.

निपाणी - येथील बेळगाव नाक्‍याशेजारी असलेल्या माने प्लॉटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये असा 7 लाख 54 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. आजारामुळे श्रीकांत घोडगे यांना कोल्हापूर येथे डायमंड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. घरातील सर्व मंडळी तेथेच असताना चोरट्यांनी हा डाव साधला. 

याबाबत पोलिस व घटनास्थळारून मिळालेली माहिती अशी, श्रीकांत घोडके यांना कंबरेचा त्रास होता. त्यामुळे शुक्रवारी (ता. 20) त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यामुळे मंगळवारी (ता. 24) घरातील सर्व मंडळी त्यांना पाहण्यासाठी गेले होते. रात्री घरात कोणीही नव्हते चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरचे गेट व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील दोन तिजोऱ्या उचकटून त्यातील साडे तीन तोळ्याचे गंठण, अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार, चार तोळ्याच्या पाटल्या, साडे चार तोळ्याचे बिलवर, दोन तोळ्याच्या एकूण सहा अंगठ्या, तीन तोळ्याची चेन, तीन तोळ्याचा राणीहार या दागिन्यासह 50 हजाराची रोकड लांबविली. याशिवाय चोरट्यांनी घरातील सर्व साहित्याची झडती घेतली. घरातील सर्वच साहित्य विस्कटून सर्व दागिने लांबविल्याने घोडके कुटुंबियांना धक्का बसला आहे. 

नेहमी गजबजलेल्या बेळगाव नाक्‍यावर रात्री 12 वाजेपर्यंत व पहाटे 4 वाजल्यापासून फिरायला जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ आहे. सध्या उन्हाळा असल्याने या परिसरात गर्दी वाढत आहे. मुख्य रस्त्यापासून केवळ 50 मीटर अंतरावर असलेल्या रस्त्यावरील बंद घराला चोरट्यांनी लक्ष केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी 8 वाजता परिसरातील नागरिकांना चोरीच्या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी कोल्हापुरात असलेल्या घोडके कुटुंबियांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. 

बुधवारी दुपारी मंडल पोलिस निरीक्षक मुत्तान्ना सवरगोळ, सहाय्यक फौजदार एम. जी. निलाखे, हवालदार एस. एस. चिक्‍कोडी यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास बेळगाव श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. सदरचे श्‍वान घराच्या परिसरासह मागील बाजूस घुटमळले. त्यानंतर बेळगाव नाक्‍यावरील मुख्य रस्त्यावर जावून थांबले. त्यामुळे चोरट्यांनी या रस्त्यावरून वाहनाने गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विश्‍वंबर घोडगे यांनी शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. 
 

Web Title: Belgaum News Nipani robbery