बेळगावात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

बेळगाव - हेल्मेटसक्‍तीची काटेकोर अमंलबजावणी करण्यास पोलिस आयुक्‍तांनी कठोर पाऊल उचलले आहे. हुबळी-धारवाडपाठोपाठ आता बेळगावातही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल त्यांना पेट्रोल देऊ नये, अशी सूचना पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी केली

बेळगाव - हेल्मेटसक्‍तीची काटेकोर अमंलबजावणी करण्यास पोलिस आयुक्‍तांनी कठोर पाऊल उचलले आहे. हुबळी-धारवाडपाठोपाठ आता बेळगावातही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल त्यांना पेट्रोल देऊ नये, अशी सूचना पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी केली. पोलिस आयुक्‍तालयात मंगळवारी (ता. २०) आयोजित शहरातील पेट्रोल पंप मालकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. 

आजपर्यंत बहुतेक अपघातांच्या घटनांमध्ये डोकीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरात सर्वत्र हेल्मेट सक्‍ती लागू करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पोलिस खात्याने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. बेळगाव पोलिस आयुक्‍तालयासह उत्तर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांत हेल्मेटसक्‍ती करण्यात आली आहे. शहरात वाहतूक पोलिस ठिकठिकाणी थांबून विनाहेल्मेट वाहन चालकांवर कारवाई करीत आहेत.

दंडात्मक कारवाई करूनदेखील वाहनधारक पोलिसांना जुमानत नसल्याने कठोर पाऊल उचलावे लागले आहे. वाहनधारकाने हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधिताला यापुढे पेट्रोल पंपचालकांनी पेट्रोल देऊ नये. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने तरी वाहनधारक हेल्मेटचा वापर करतील. यासाठी पेट्रोल पंप चालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंती पोलिस उपायुक्‍तांनी केली. 

यावेळी उपस्थित पेट्रोल पंप मालकांनी पोलिस उपायुक्‍तांच्या विनंतीला मान देऊन सूचनेचे पालन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. बैठकीला गुन्हे आणि वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्‍त महानिंग नंदगावी, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍त एम. आय. मुप्पीनमठ, वाहतूक उत्तर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.
 

Web Title: Belgaum News No Helmet No Petorl