बेळगावकरांना चित्ररथ मिरवणुकीचे वेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

बेळगाव - गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग असलेले कार्यकर्ते मतदानानंतर आता शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला लागले आहेत. शहरात शनिवारी (ता. 19) चित्ररथ मिरवणूक होणार आहे.

मिरवणुकीसाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे दिमाखात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

बेळगावच्या शिवजयंतीला ऐतिहासिक परंपरा असून, यावर्षी बेळगावच्या शिवजयंती उत्सवाचे 99 वे वर्ष आहे. शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहर व परिसरात 17 एप्रिलला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती.

शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत शिवजयंती झाल्यानंतर शुक्रवारी (ता. 18) वडगाव व अनगोळ भागात, तर शहर परिसरात शनिवारी (ता. 19) भव्य प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून विविध मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीऐवजी निवडणूक प्रचार व इतर कामात गुंतले होते. मात्र, शनिवारी (ता. 12) मतदान झाल्यानंतर रविवारी शहर व परिसरातील कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन शिवजयंती मिरवणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. 

काही मंडळानी चित्ररथ मिरवणुकीत सादर करण्यात येणाऱ्या देखाव्यांचा सराव सुरू केला आहे. तर काही मंडळांचे कार्यकर्ते ट्रकची चस्सी सांगण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत. चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीसाठी फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कमी वेळेत चांगल्याप्रकारे देखावा सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. 

सर्वच जण निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिक बैठका घेता आल्या नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 19 तारखेला चित्ररथ मिरवणूक काढण्यात येईल. निकालानंतर मध्यवर्ती मंडळाकडून मिरवणुकीचा कर्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. वेळ कमी असला तरी चांगल्याप्रकारे मिरवणूक व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
- दीपक दळवी,
अध्यक्ष, 
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ 

Web Title: Belgaum News Shivjayanti Chitrarath festival