महिलेच्या मृत्यूनंतर रायबाग पेटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

रायबाग - नंदीकुरळी (ता. रायबाग) येथे मंगळवारी (ता. २९) रात्री खडीमशीन बंद करण्यावरून दगडफेक झाली. 
या वेळी झालेल्या पळापळीत रहेमतबी मिरासाब मुल्तानी (वय २५) या महिलेचा मृत्यू झाला.

रायबाग - नंदीकुरळी (ता. रायबाग) येथे मंगळवारी (ता. २९) रात्री खडीमशीन बंद करण्यावरून दगडफेक झाली. 
या वेळी झालेल्या पळापळीत रहेमतबी मिरासाब मुल्तानी (वय २५) या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी (ता. ३०) येथील नागरिकांनी रायबाग बंद करून काही बसेसवर दगडफेक केली. दगडफेकीत बसस्थानकातील कंट्रोल रुमसह संगणक संच उद्‌ध्वस्त झाले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे जमाव अधिकच आक्रमक बनला.

याबाबत अधिक माहिती अशी, नंदीकुरळी गावात सुरू असलेले खडीमशीन बंद करण्यासाठी गावातील मुल्तानी कुटुंबीय धरणे आंदोलन करत आहेत. मंगळवारी (ता. २९) रात्री त्यांनी खडीमशीन आवारात जावून मशीन बंद करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी वाद होऊन तो विकोपाला गेला आणि परस्परविरोधी दगडफेक झाली. त्यामध्ये मुल्तानी कुटुंबातील महिला रहेमतबी मिरासाब मुल्तानी हिचा मृत्यू झाला. याबाबत तिच्या कुटुंबियांनी रायबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. रहेमतबी हिचा मृत्यू दगडफेकीत झाल्याचा आरोप करून रायबाग बंदचे आवाहन करत बुधवारी आंदोलन केले. रात्री उशीरापर्यंत रायबागमध्ये तणावाचे वातावरण होते.

यावेळी काही संतप्त आंदोलकांनी रायबाग बसस्थानकातील बसवर दगडफेक केल्याने तणाव वाढला. या दगडफेकीत काही प्रवासीही जखमी झाले. स्थानकातील कंट्रोलरुमसह संगणक कक्षही जमावाने फोडला. जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी लाठीमार केला. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. दगडफेकीसह पोलिसांच्या लाठीमारात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मुल्तानी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शवविच्छेदन करू न देण्याचा इशारा रयत संघटनेने दिला. कायद्याने संबंधित महिलेला न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन तहसीलदार पुजार व जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी दिले. त्यानंतर सायंकाळी तणाव काहीसा निवळला. या प्रकरणी २० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काही दुचाकीही जप्त केल्या आहेत. सायंकाळी उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Belgaum News Tense in Raibag after death of woman