टिपू जयंती कार्यक्रम पत्रिकेतून केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांचे नाव वगळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

बेळगाव - जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. १०) होणाऱ्या टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रम पत्रिकेतून अखेर केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे नाव वगळले आहे. पण, टिपू जयंती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका असलेले आमदार संजय पाटील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत कायम आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांच्याकडे विचारणा केली असता मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार उभयतांची नावे वगळल्याची माहिती त्यांनी दिली. 

टिपू सुलतान जयंती १० नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात काढलेल्या निमंत्रण पत्रिकेत जयंतीला विरोध करणारे केंद्रीय मंत्री हेगडे व खासदार अंगडी यांचे नाव होते. मंत्री हेगडे यांचे नाव तर विशेष निमंत्रित म्हणून होते. त्याची चांगलीच चर्चा राज्यात झाली होती. निमंत्रण पत्रिकेत नाव न घालण्याची विनंती केली असेल त्यांचे नाव पत्रिकेतून वगळण्याची मुभा मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी झियाउल्ला यांना दिली. त्यानुसार ही दोन्ही नावे पत्रिकेतून वगळली आहेत. नवी निमंत्रण पत्रिका छापून तिचे वाटपही करण्यात आले. 

जयंतीचा वाद गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने जयंतीची निमंत्रण पत्रिका तयार करण्यापूर्वी मुख्य सचिवांशी चर्चा करणे आवश्‍यक होते. पण, तसे न करता निमंत्रण पत्रिका छापल्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले.  आमदार संजय पाटील व भाजपच्या बहुतेक सर्व लोकप्रतिनिधींनी टिपू सुलतान जयंतीला विरोध केला आहे. आमदार पाटील यांनी तर मंगळवारी निघालेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केले होते. याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे. पण, त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत कायम आहे. जिल्ह्यातील भाजपचे अन्य खासदार व आमदारांची नावेही निमंत्रण पत्रिकेत आहेत. 

Web Title: Belgaum News Tipu Sultan birth anniversary issue