व्यापाऱ्यांमुळे सापडला चोरटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

बेळगाव - मिसरूडही न फुटलेल्या तिघा तरुणांनी गेल्या दोन आठवड्यात बाजारपेठेतील सातहून अधिक दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांनी जंगजंग पछाडले, तरी ते हाती लागत नव्हते. पण, शुक्रवारी (ता. २५) बापट गल्लीतील व्यापाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांचे नशीब फळफळले अन्‌ तिघांपैकी एक चोरटा आयताच हाती लागला. 

बेळगाव - मिसरूडही न फुटलेल्या तिघा तरुणांनी गेल्या दोन आठवड्यात बाजारपेठेतील सातहून अधिक दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांनी जंगजंग पछाडले, तरी ते हाती लागत नव्हते. पण, शुक्रवारी (ता. २५) बापट गल्लीतील व्यापाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांचे नशीब फळफळले अन्‌ तिघांपैकी एक चोरटा आयताच हाती लागला. 

एका एटीएमच्या सीसीटीव्हीत दुचाकी चोरताना एक चोरटा कैद झाला होता. पण, त्याची ओळख पोलिसांना पटत नव्हती. दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. बापट गल्लीत नीलेश शहापूरकर यांचे विशाल कम्युनिकेशन्स नावाचे दुकान आहे. दुकानात नीलेश यांचे मेव्हणे विपुल मुरकुटे गेले होते. त्यांनी शिवरायांचे चित्र असलेली आपली स्प्लेंडर प्लस दुचाकी गल्लीतच लावली होती. पण, ती लॉक केली नव्हती. ही संधी साधून एक तरुण ती दुचाकी ढकलत नेत होता. त्याच वेळी विपुल मोबाईलवर बोलत दुकानाबाहेर आले असता आपली दुचाकी भलताच कुणीतरी नेत असल्याचे दिसले. ‘कुणाची दुचाकी ढकलत नेत आहेस,’ अशी विचारणा केली असता चोरटा बिथरला व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तो चोरटा असल्याचे समजताच गल्लीतील व्यापाऱ्यांनी त्याला पकडले. 

व्यावसायिक प्रकाश राऊत यांनी खडेबाजार पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बापट गल्लीत जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर तो चोरटा असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या पंधरा दिवसांत सात दुचाकी चोरणाऱ्यांच्या या टोळीत तिघांचा समावेश आहे. त्यांतील दोघे अल्पवयीन असून एकजण प्रौढ आहे. बापट गल्लीत सापडलेला चोरटा अल्पवयीन आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.  

व्यापाऱ्यांचे प्रसंगावधान
बापट गल्लीतून दुचाकी नेताना चोरटा विशाल कम्युनिकेशन्सच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संशयित चोरट्याला व्यापाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने पोलिसांचे काम सोपे झाले. या कामी नीलेश शहापूरकर व प्रकाश राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Belgaum News Trash found by traders