बंगालमध्ये भाजपचा 'रंग माझा वेगळा'! 

बंगालमध्ये भाजपचा 'रंग माझा वेगळा'! 

कोलकाता : राजकारणाचा रंग वेगवेगळा असू शकतो; पण रंगाचा राजकारणाशी काही संबंध असू शकतो का? या प्रश्‍नाचे उत्तर पश्‍चिम बंगालपुरते तरी होय असे आहे. सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे निळ्या आणि भाजपचे भगव्या-हिरव्या रंगांचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यावरून आता थेट ग्रामपंचायत पातळीवर वाद पेटला आहे! 

प. बंगालच्या बॉंकुरा जिल्ह्यातील मंडलकुली ही ग्रामपंचायत या वादाचे कारण आहे. तेथे तृणूमल कॉंग्रेसला धूळ चारत भाजपने 15 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. सत्ता येताच भाजपने ग्रामपंचायतीची इमारत भगव्या आणि हिरव्या रंगांत रंगवून टाकली. त्यासाठी 80 हजार रुपयांचा खर्चही केला. ही ग्रामपंचायत तृणमूल कॉंग्रेसच्या ताब्यात असताना निळ्या रंगात रंगली होती. बॉंकुरा जिल्ह्याच्या जंगलमहाल विभागात भाजपने जिंकलेल्या आठ ग्रामपंचायतींमध्ये मंडलकुली एक आहे. उरलेल्या सात ग्रामपंचायतींची कार्यालयेही लवकरच भगव्या-हिरव्या रंगांत न्हातील, असे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. 

आधीच पराभव आणि त्यानंतर आवडता रंगही गेल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसचे मंडलकुलीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. करदात्यांचा पैसा असा खर्च करता येत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. मात्र, सरकारी कार्यालये निळ्या-पांढऱ्या रंगांतच असावीत असा सरकारचा लेखी आदेश नसल्याने आम्ही काही गैर केले नसल्याचा भाजपचा दावा आहे. रंगकामाची निविदा प्रसिद्ध करूनच हे काम करण्यात आल्याचेही भाजप कार्यकर्ते म्हणतात. 

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाचे प्रेम प्रसिद्ध असून, त्यावर भाजप कायम टीका करतो. दीदींच्या राज्यात सध्या प्रत्येक वस्तू निळ्या-पांढऱ्या रंगात रंगलेली दिसते. आपापली घरे निळ्या रंगात रंगवा आणि करात सवलत मिळवा, असे कोलकता महापालिकेनेच जाहीर केले आहे. केवळ वारसा दर्जामुळे प्रख्यात "रायटर्स बिल्डिंग' मात्र या तडाख्यातून बचावली आहे. या इमारतीचे सध्या नूतनीकरण सुरू असून, या कामानंतरही ती लाल रंगातच राहील. 

जयपूरचे उदाहरण 
रंगप्रेमाचे समर्थन करताना दीदी बॅनर्जी जयपूरचे उदाहरण देतात. तेथील बहुतेक इमारती गुलाबी रंगाच्या आहेत. त्यापेक्षा निळा रंग खूपच आल्हाददायक असल्याचा दावा त्या करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com