
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतीत एक चूक समोर आलीय.
चक्क केंद्रीय मंत्री गडकरींना एक कप चहासाठी ताटकळत बसावं लागलं!
बंगळुरू (कर्नाटक) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबाबतीत एक चूक समोर आलीय. त्यामुळं गडकरींना काही काळ ताटकळत बसावे लागले. त्याचं झालं असं की, केंद्रीय मंत्री गडकरी यांना सोमवारी कलबुर्गी विमानतळावर (Kalaburagi Airport) एका कप चहासाठी (Tea) 15 मिनिटं ताटकळत बसावं लागलं. 15 मिनिटात दोनदा चहा मागवून देखील त्यांना चहा लवकर मिळाला नाही. याचं कारण आता समोर आलंय.
गडकरींसाठी मागवण्यात आलेल्या चहाला कर्नाटकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सिक्युरिटी क्लिअरन्स देण्यात आला नसल्यानं त्यांना चहा मिळायला उशीर झाला, अशी माहिती समोर आलीय. महाराष्ट्रातील अक्कलकोट (Akkalkot in Maharashtra) येथून हेलिकॉप्टरनं भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी गडकरी देवल-गाणगापूर इथं गेले. दर्शनानंतर ते विशेष विमानानं दिल्लीला जाण्यासाठी कलबुर्गी विमानतळावर आले. तिथं वाट पाहत असताना गडकरींनी 15 मिनिटांत दोनदा चहा मागवला.
हेही वाचा: धर्म संसदेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तराखंड सरकारला फटकारलं; म्हणाले..
दरम्यान, गडकरींच्या स्वागतासाठी आलेले भाजपचे आमदार बी. जी. पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चहा घेऊन येण्याचे निर्देश दिले. विमानतळ संचालक ज्ञानेश्वरराव यांनी नंतर सांगितलं की, विमानतळाच्या कॅन्टीनमधून चहाची व्यवस्था करण्यात आली होती, तेव्हा कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी (Karnataka State Industrial Security Force Officer) सिक्युरिटी क्लिअरन्स दिला नाही. त्यामुळं विमानतळ कर्मचाऱ्यांनी बाहेरून चहा आणून मंत्र्यांना दिला. त्यानंतर घटनास्थळी आलेले कलबुर्गीचे खासदार उमेश जाधव (Kalaburagi MP Umesh Jadhav) यांनी ही चूक पुन्हा करू नये, असं विमानतळ प्राधिकरणाला सुनावलंय.
Web Title: Bengaluru Union Minister Nitin Gadkari Asks For Tea Twice At Kalaburagi Airport Waits For 15 Minutes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..