Bharat Bandh Today: 'भारत बंद'ला चांगला प्रतिसाद; दुकानांना टाळे, रस्ते सामसुम

strike
strike

नवी दिल्ली- देशभरातील व्यापाऱ्यांनी आज (२६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहे. भारत बंदचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. अनेक राज्यातून भारत बंदला प्रतिसाद मिळत आहे. जाचक वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीविरोधात हा बंद पुकारण्यात आला असून ठिकठिकाणी चक्काजामही करण्यात येणार असल्याचं कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (सीएआयटी) कळवलं आहे. व्यापारी, वाहतुकदार आणि कर व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभाग असणार आहे. याशिवाय ई-वे बिल आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीविरोधात बंदची हाक देण्यात आली आहे. 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये बंदचे परिणाम दिसून आले. याठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आले असून बाजार पूर्णपणे बंद आहे. देशातील अनेक राज्यातूनही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील अनेक व्यापारी संस्था बंद आहेत. रस्ते सामसुम दिसत आहेत. व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवले असून, दुकानदारांनी दुकानांना टाळे लावले आहेत. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्येही रस्ते सामसुम झाल्याचं पाहायला मिळालं.

२६ फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीसहित देशभरातील सुमारे १५०० ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या बंदला देशभरातील ४०,००० हून अधिक व्यापारी संघांचं समर्थन असणार आहे.  तसेच निषेध म्हणून या दिवशी कोणताही व्यापारी जीएसटी पोर्टलवर लॉग इन करणार नाहीत, असं सीएआयटीचे पदाधिकारी प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं आहे. जीएसटी करप्रणाली सहज होण्याऐवजी खूपच गुंतागुंतीची बनली आहे. जीएसटीचा मूळ उद्देश एकदम उलट झाला आहे. जीएसटीचं पालन करताना व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीएसटी करप्रणालीला तर्कसंगत करण्याऐवजी व्यापाऱ्यांवर कर पालन करण्याचा जास्तीत जास्त बोजा टाकण्याच्या दिशेने जीएसटी परिषद काम करत आहे, जे पूर्णपणे लोकशाहीविरोधात आहे, असा आरोपही खंडेलवाल यांनी केला आहे. 

 व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?

1) जीएसटीने सरकारी अधिकाऱ्यांना मनमानी आणि अमर्याद शक्ती प्रदान केल्याने देशात कर दहशतवादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील ८ कोटी व्यापाऱ्यांचा आता एकच आवाज आहे तो म्हणजे जीएसटीला सुटसुटीत बनवा. 
२) वस्तू व सेवा कर प्रणाली ही चांगलीही नाही आणि सुटसुटीतही नाही. ही व्यवस्था पूर्णपणे सुटसुटीत व्हायला हवी. 
३) एक आदर्श करप्रणाली तीच असते जी व्यापाऱ्यांचं भलं आणि फायद्याचा विचार करेल. आपले नियम गुंतागुंतीचे आणि त्रासदायक बनवणारी व्यवस्था कामाची नाही.
४) व्यापार सोपा करायचा सोडून उलट आम्हाला असंख्य नियम आणि अधिकाऱ्यांच्या छळवणूकीचा सामना करावा लागत आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com