देशात आणखी चार लशींवर काम सुरु; भारत बायोटेक 16 लाख डोस देणार मोफत

टीम ई सकाळ
Tuesday, 12 January 2021

देशात कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सुरु असून केंद्र सरकारने याबाबतचा अहवाल सादर केला. यात सांगण्यात आलं की, देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनशिवाय आणखी चार लसींवर काम सुरु आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सुरु असून केंद्र सरकारने याबाबतचा अहवाल सादर केला. यात सांगण्यात आलं की, देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनशिवाय आणखी चार लसींवर काम सुरु आहे. सर्व लसी वेगवेगळ्या ट्रायल स्टेजमध्ये आहेत.

जायडस कॅडिला आणि रशियाची व्हॅक्सिन स्पुतनिक व्ही तिसऱ्या टप्प्यात आहे. याशिवाय बायोलॉजिकल ई आणि पुण्यातील जिनोव्हा कंपनीच्या लशीची चाचणी पहिल्या टप्प्यात सुरु आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. भारतातच या व्हॅक्सिनची निर्मिती होत असल्याचंही ते म्हणाले. पुढच्या काही महिन्यांमध्ये यातील काही लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. 

हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर निश्चिंत होऊ नका; काय काळजी घ्यावी लागणार?

सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, भारत सरकारने सीरम इन्स्टिट्टूयकड़ून 1 कोटी 10 लाख डोस 200 रुपये प्रति दराने खरेदी केले आहेत. डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. याशिवाय भारत बायोटेकच्या 55 लाख डोसची ऑर्डरही देण्यात येत आहे. भारत बायोटेकनं सध्या 16.5 लाख डोस भारत सरकारला मोफत उपलब्ध करून देण्याचं सांगितलं आहे. 

लशींच्या किंमती किती असणार?

  • भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची किंमत 206 रुपये असणार आहे.
  • फायजर आणि बायोएनटेकच्या व्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 1431 रुपये आहे.
  • मॉडर्नाच्या व्हॅक्सिनचा एक डोस 2348 ते 2718 रुपयांपर्यंत असेल. 
  • सिनोफार्म कंपनीच्या व्हॅक्सिनच्या एका डोससाठी 5650 रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागेल. 
  • भारतात तयार होणाऱ्या कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 200 रुपये असणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी सोमवारी 12 हजार 481 नवे रुग्ण आढळले. 16 जूननंतर आढळलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तेव्हा एका दिवसात 11 हजार 85 रुग्ण सापडले होते. रविवारी 18 हजार 578 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat biotech wil give more than 16 lakh dose free to goi say rajesh bhushan