भारताचं स्वदेशी व्हॅक्सिन ठरतंय प्रभावी; क्लिनिकल ट्रायलचे परिणाम जाहीर

टीम ई सकाळ
Wednesday, 16 December 2020

भारताच्या स्वदेशी कोरोना व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) मिळून व्हॅक्सिन तयार करत आहेत. 

नवी दिल्ली - भारताच्या स्वदेशी कोरोना व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) मिळून व्हॅक्सिन तयार करत आहेत. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये हे व्हॅक्सिन अँटिबॉडी तयार करण्यात यशस्वी ठरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

कंपनीने म्हटलं की, व्हॅक्सिनने न्यूट्रलायजिंग अँटिबॉडी तयार केली आहे. तसंच सर्व प्रकारच्या डोस ग्रुपमध्ये यावर चांगला प्रतिसाद होता. चांगली बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. पहिल्या डोसनंतर काही दुष्परिणाम आढळले होते पण ते सौम्य असे होते आणि कोणत्याही औषधांशिवाय बरेही झाले. सामान्य असा परिणाम म्हणजे इंजेक्शन जिथं दिलं जातं तिथं येणारी रिअॅक्शन. मात्र तेसुद्धा जास्त काळ राहिलं नाही. 

हे वाचा - 'जगातील 20 टक्के लोकसंख्येला 2022 पर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता कमी'

BBV152 असं नाव असलेल्या या व्हॅक्सिनला 2 ते 8 डीग्री तापमानात ठेवावं लागतं. यामुळेच या व्हॅक्सिनची देशभरात वाट पाहिली जात आहे. फायजर किंवा मॉडर्नाच्या व्हॅक्सिनसाठी तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था करणं आव्हान आहे. फायजरच्या लशीसाठी -70 डीग्री तर मॉडर्नाच्या लशीसाठी -30 डीग्री तापमान आवश्यक आहे. 

भारत बायोटेकच्या व्हॅक्सिनची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्याचे रिझल़्ट आता जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारत बायोटेकच्या लस निर्मितीचा आढावा घेतला होता. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैज्ञानिक आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोव्हॅक्सिनबाबत माहिती घेतली होती. 

हे वाचा - कोरोनाला संपविण्याचा स्वस्त उपाय असल्याचा दावा;अमेरिकेतील संशोधन

याआधी भारत बायोटेक नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोविड लशीची निर्मिती करत असल्याचं म्हटलं जात होतं. त्याची पहिल्या टप्प्यातील चाचणी पुढच्या महिन्यात सुरु होऊ शकते. भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, भारत बायोटेक कोव्हॅक्सिनसह इतर लशींच्या उत्पादनासाठी दोन ते तीन युनिट तयार करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat biotechs covaxin clinical trial results immune response trigger