भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अंतिम टप्प्यात;  DCGI ने चाचण्यांना दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

कोव्हॅक्सिनच्या पुढील चाचण्यांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजेआय) काल परवानगी दिली होती. पुढील महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या या चाचण्या सुरू करण्याचा भारत बायोटेकचा विचार आहे. 

नवी दिल्ली - भारत बायोटेकने कोरोनाला रोखण्यासाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना अखेर परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब व आसाममधील सुमारे २५ हजार लोकांना २८ दिवस चालणाऱ्या या चाचण्यांमध्ये सहभागी करून घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

कोव्हॅक्सिनच्या पुढील चाचण्यांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजेआय) काल परवानगी दिली होती. पुढील महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या या चाचण्या सुरू करण्याचा भारत बायोटेकचा विचार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अतिशय किचकट असतात व त्यांचे परिणाम दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना लशीचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भारत बायोटेकच्या लशीचे अंतिम निष्कर्ष हे फेब्रुवारी अखेरपर्यंत येतील अशी आशा संशोधकांना आहे.

हे वाचा - Positive Story : कोरोनाच्या लशीसाठी मोदी सरकारची तयारी; मोठी रक्कम ठेवली बाजूला

हैदराबादमध्ये असलेल्या भारत बायोटेक कंपनीने डीसीजीआयला 2 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली हती. कंपनीने म्हटलं होतं की, या टप्प्यामध्ये 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या 28 हजार 500 लोकांवर चाचणी घेतली जाईल. यामध्ये दहा राज्यातील 19 ठिकाणांचा समावेश होता. यात दिल्ली, मुंबई, पटना आणि लखनऊसुद्धा आहे.

हे वाचा - आणखी एका राज्यात मोफत कोरोना लशीची घोषणा

दरम्यान कोरोनाच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीला ठोस असा शास्त्रीय आधार नसल्याचा पुनरुच्चार आरोग्य यंत्रणेने केला आहे. प्लाझ्माचे दुष्परिणाम समोर आले तर त्यावर देखील बंदी घालू असा इशारा आयसीएमआरने दिला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांनी प्लाझ्मा उपचारांची संख्या वाढविली आहे. दिल्लीत तर देशातील पहिली प्लाझ्मा बॅंकही सुरू करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat biotechs gets dcgi nod for coronavirus-vaccine phase 3 clinical trials