भैय्यूजी महाराजांवर सरकारचा दबाव ; करणी सेनेचा आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

भैय्यूजी महाराजांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्येनंतर विविध चर्चा सुरु होत्या. भैय्यूजी महाराजांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते.

नवी दिल्ली : भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येवरून विविध चर्चा सुरु असताना आता भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येवर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने वक्तव्य केले. ''भैय्यूजी महाराजांवर सरकारचा दबाव होता. या दबावामुळेच त्यांनी आत्महत्या केली'', असा आरोप करणी सेनेने केला आहे.

भैय्यूजी महाराजांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्येनंतर विविध चर्चा सुरु होत्या. भैय्यूजी महाराजांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर करणी सेनेने यावर वक्तव्य केले. ''भैय्यूजी महाराजांकडे नर्मदा गैरव्यवहाराचे दस्ताऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव वाढवला होता. या दबावामुळेच भैय्यूजी महाराजांनी आत्महत्या केली''. 

दरम्यान, जर सरकार खरोखरच प्रामाणिक असेल तर या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी. या सीबीआय चौकशीमुळे सगळे सत्य बाहेर पडेल, असेही करणी सेनेने सांगितले.

Web Title: bhayyu maharaj was under pressure of the government says karani senna