भय्यूजी महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आज येथील "सिल्व्हर स्प्रिंग्ज' या राहत्या घरी साधारणपणे दोनच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली, यानंतर जखमी अवस्थेतच त्यांना इंदूरमधील बॉंबे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, पण तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे सांगत आपण आता खूप थकलो असल्याने सोडून जात आहोत, आपल्या कुटुंबाची जबाबदारी इतरांनी घ्यावी, असे म्हटले आहे.

इंदूर (मध्य प्रदेश) - प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आज येथील "सिल्व्हर स्प्रिंग्ज' या राहत्या घरी साधारणपणे दोनच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली, यानंतर जखमी अवस्थेतच त्यांना इंदूरमधील बॉंबे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, पण तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे सांगत आपण आता खूप थकलो असल्याने सोडून जात आहोत, आपल्या कुटुंबाची जबाबदारी इतरांनी घ्यावी, असे म्हटले आहे. 

दरम्यान, घरामध्ये संपत्तीवरून निर्माण झालेला वाद आणि कर्जाचा बोजा यामुळे भय्यूजींना नैराश्‍य आले होते, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्‍यता त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. खुद्द भय्यूजी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्येही नैराश्‍याचा उल्लेख केला आहे. आता भय्यूजी यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार असून, अनुयायांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव येथील सूर्योदय आश्रमामध्ये ठेवण्यात येईल. राजकीय वर्तुळामध्ये उठबस असणाऱ्या भय्यूजींचे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये हजारो अनुयायी आहेत. "सद्‌गुरू धार्मिक ट्रस्ट'च्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवित असत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण या क्षेत्रांमध्येही त्यांच्या संस्था काम करत होत्या. महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनामध्ये त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. मध्य प्रदेश सरकारने त्यांना याचवर्षी राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता, पण त्यांनी तो नाकारला होता. 

प्रकृतीची तक्रार 
भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नोव्हेंबर 2015 मध्ये पुण्यातच निधन झाले होते, तेव्हापासून ते तणावात होते. यानंतर त्यांनी 2017 मध्ये मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या डॉ. आयुषी शर्मा यांच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. कामाचा वाढलेला व्याप आणि कौटुंबिक कलह यामुळे त्यांची प्रकृती वारंवार बिघडत होती, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

शेवटचे ट्विट 
आत्महत्येपूर्वी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून शेवटचे ट्‌विट केले होते. एका संस्कृत वचनाबरोबरच त्यांनी महादेवाचा फोटो अपलोड करत मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. भय्यूजी यांनी अपलोड केलेल्या संस्कृत वचनाचा अर्थही गंभीर आहे. "हे मृत्युंजय महादेवा, मला वाचव, मी तुला शरण आलो आहे' अशी याचनाच त्यांनी केली होती. 

Web Title: Bhayyuji Maharaj Shoot Himself Dead