भाजप नेत्यांना कोरोनाचा तडाखा; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते विलगीकरणात 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

भूपेंद्र यादव व भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हेही गेले अनेक दिवस काही कोरोनाग्रस्त नेत्यांच्या सतत संपर्कात राहिलेले असून त्यांनाही राष्ट्रीय नेतृत्वाकडून प्रकृतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आलेले असताना भाजपचे एकामागोमाग एक नेते कोरोनाच्या तडाख्यात सापडले आहेत. शाहनवाज हुसेन व राजीव प्रताप रूडी, प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे, उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह किमान डझनभर भाजप नेते कोरोना संक्रमणाने विलगीकरणात गेले आहेत. हुसेन यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करावे लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिहारची रणधुमाळी भरात आली असताना भाजपच्या प्रमुख बिहारी नेत्यांना प्रचारातून बाजूला व्हावे लागणार असल्याने पंतप्रधानांपासून जे. पी. नड्डा, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नक्वी, भूपेंद्र यादव या दिल्लीकर नेत्यांवरच भाजपला प्रचाराची भिस्त ठेवावी लागणार आहे. रुडी व शहानवाज यांना भाजपने बिहारच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर ती फक्त पहिल्या टप्प्यासाठीची यादी असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. आता दोघेही कोरोना संक्रमित झाल्याने दुसऱ्या टप्प्याचा प्रचारही ते करू शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये कोरोना आरोग्य नियम पायदळी तुडवले जात असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे. राज्यात आतापावेतो २ लाखांहून जास्त कोरोनाग्रस्त असून १०१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. १ लाख ९४ हजार ८८९ लोक बरे झाले .

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काळजी घ्या 
भूपेंद्र यादव व भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हेही गेले अनेक दिवस काही कोरोनाग्रस्त नेत्यांच्या सतत संपर्कात राहिलेले असून त्यांनाही राष्ट्रीय नेतृत्वाकडून प्रकृतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. शाहनवाज हुसेन यांनी स्वतः ट्विट करून आपण कोविडग्रस्त झाल्याचे पण काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. इतरांनी तसे सांगितलेले नाही. मात्र सुशील मोदी, रुडी व पांडे गेल्या काही दिवसांपासून तापाने त्रस्त आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhihar election 2020 BJP leaders have gone into secession due to the Corona transition