भोपाळमध्ये पोलिसांकडून चकमक नव्हे; खूनच

पीटीआय
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

चकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार
भोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. "या खुनांची' केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करत या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

चकमकीत मारलेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांचा आरोप; दाद मागणार
भोपाळ - सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे आठ कार्यकर्ते तुरुंगातून पळून गेल्यानंतर संशयास्पद पोलिस चकमकीत मारले गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह डाव्या पक्षांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. "या खुनांची' केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करत या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत वकील परवेझ आलम यांनी सांगितले की, या कार्यकर्त्यांचे कुटुंबीय न्याय मिळण्याची मागणी करत असून, यासाठी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. कैदी असलेल्या या कार्यकर्त्यांनी तीस फुटांच्या भिंतीवरून उडी मारल्याचे तुरुंगातील अधिकारी सांगतात. हे शक्‍य आहे काय? ही चकमक बनावट असून, कैद्यांनी हल्ला केल्याचा कोणताही पुरावा नाही. आलम यांनी पोलिसांवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. दरम्यान, आठपैकी सात कैद्यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी भोपाळमध्ये आले आहेत. सोलापूरमधील महंमद खालिद याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अद्याप कोणीही आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरीही, त्यांच्या चौकशीवर विश्‍वास नसल्याने न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी डाव्या पक्षांनी केली आहे.

कॉंग्रेसनेही सर्व तपासावर न्यायालयाचे नियंत्रण असण्याची मागणी केली आहे. "सर्व पळून गेलेले कच्चे कैदी मुस्लिमच कसे होते?' असा सवालही कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेश पोलिसांवर चकमकीप्रकरणी संशय व्यक्त होत असतानाच केंद्र सरकार मात्र त्यांच्या मदतीला धावून आले आहे. केवळ एका व्हिडिओच्या आधारे पोलिसांवर संशय घेणे थांबवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री किरण रिज्जू यांनी केले आहे. चौकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल, त्यामुळे शंका उपस्थित करण्याची सवय सोडा, असे रिज्जू म्हणाले.

रा. स्व. संघाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी रचलेले हे कटकारस्थान आहे. पोलिसांचे चकमकीचे कृत्य संशयास्पद आहे. पळून गेलेल्या कैद्यांना अटक न करता त्यांना ठार का मारले? व्यापमं गैरव्यवहार प्रकरणातून भाजपच्या बड्या नेत्यांना वाचविण्यासाठीच हे कृत्य करण्यात आले आहे.
- मायावती, बसप नेत्या

साबरमती तुरुंगांमध्ये सुरक्षेचा फेरआढावा
भोपाळमध्ये तुरुंगातून कैदी पळून गेल्याच्या घटनेनंतर गुजरातमधील साबरमती आणि बिहारमधील बेऊर मध्यवर्ती कारागृहांमध्ये सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात आला. या दोन्ही तुरुंगांमध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांतील आरोपींना ठेवले आहे. तसेच, "सिमी'चेही काही कार्यकर्ते या तुरुंगांमध्ये आहेत. या दोन्ही राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली हा फेरआढावा घेण्यात आला. या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म तपासण्यात आले.

Web Title: Bhopal encounter mysterious : CPI