धक्कादायक! पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं सामूहिक बलात्कार पीडितेची आत्महत्या; 3 आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

बलात्कार करणाऱ्या नराधमांची तक्रार करण्यासाठी तिने अनेकदा पोलिसात धाव घेतली पण एफआय़आर दाखल करून घेण्यात आला  नाही. अखेर पीडितेने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी धावाधाव केली. 

​भोपाळ - उत्तर प्रदेशातील हाथरस इथं पोलिसांची दडपशाही दिसत असताना आता मध्य प्रदेशात धक्कादायक अशी घटना घडली आहे. नरसिंहपूरमधील चिचली गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्यानं महिलेनं 2 ऑक्टोबरला आत्महत्या केली. त्यानंतर डोळे उघडलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

​दरम्यान, या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेजबाबदारपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिस स्टेशन प्रभारी मिश्रीलाल यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली. याशिवाय अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि एसडीओपींना हटवण्यात आलं आहे. 

हे वाचा - hathras case: वडिलांना मारहाण, मोबाईलही घेतले; पीडितेच्या भावाची धक्कादायक माहिती

नरसिंहपूरमधील चिंचली गावात सामूहिक बलात्कार पीडितेनं आत्महत्या केली. पीडितेच्या पतीने आरोप केला की, बलात्कार करणाऱ्या नराधमांची तक्रार करण्यासाठी तिने अनेकदा पोलिसात धाव घेतली पण एफआय़आर दाखल करून घेण्यात आला  नाही. अखेर पीडितेने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी धावाधाव केली. जेव्हा हे प्रकरण मुख्यमंत्री शिवराज यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक बैठकसुद्धा घेतली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना आदेश दिले की, राज्यात कोणत्याही प्रकारची गुंडागर्दी आणि लोकांची फसवणूक करणाऱ्यांना माफ केलं जाऊ नये. दहशत माजवणाऱ्यांच्या मनात बीती निर्माण झाली पाहिजे. गुन्हेगारांविरोधात कठोर पावलं उचला आणि त्यांच्यावर कारवाई करा. 

हे वाचा - देशातील तब्बल एवढ्या राज्यांत होतेय दलितांची घुसमट; एनसीआरबीची धक्कादायक माहिती

मध्य प्रदेशातील परिस्थिती बिघडल्याचं आणि बलात्काराची प्रकरणे वाढल्याचा आरोप करत कमलनाथ यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपचे सरकार असेलेल्या राज्यांमध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ घोषणेचं वास्तव हेच आहे का? उत्तर प्रदेश पाठोपाठ मध्य प्रदेशात अशा घटना सातत्याने होत आहे. एका महिलेवर बलात्कार होतो आणि तिला न्याय देण्याऐवजी तिचाच छळ केला जातो. शेवटी हतबल झालेल्या पीडितेनं आत्महत्या केली. हा कसला कायदा आणि सुव्यवस्था? दोषींवर कारवाई का नाही? विरोधी पक्षात असताना आंदोलन करणारे आज गप्प का असे प्रश्नही कमलनाथ यांनी विचारले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhopal gangrape victim suicide action taken against 2 police and 3 suspect arrest