एक कोटी महिलांना दरमहा मिळणार एक हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivraj singh chauhan

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिला कल्याण योजनेची घोषणा केली.

Shivraj Singh Chauhan : एक कोटी महिलांना दरमहा मिळणार एक हजार

भोपाळ - आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिला कल्याण योजनेची घोषणा केली. ‘मुख्यमंत्री लाडली बहना‘ असे नाव या योजनेस देण्यात आले आहे. कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि प्राप्तीकर भरण्याची आवश्यकता नसलेल्या महिलांना याचा फायदा होईल. त्यांना दरमहा एक हजार रुपये मिळतील. चौहान यांनी आपल्या वाढदिवशी रविवारी ही घोषणा केली.

या योजनेचा किमान एक कोटी महिलांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेसाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करावे लागतील. छाननीनंतर एक मे रोजी प्राथमिक, तर ३१ मे रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल. लाभार्थी महिलांना दहा जूनपासून ही रक्कम मिळेल.

२०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपला थोडक्यात पराभव पत्करावा लागला. त्याआधी १५ वर्षे भाजपकडे सत्ता होती. काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर १५ महिन्यांत भाजपने सत्ता काबीज केली. काँग्रेसच्या २२ आमदारांनी कमलनाथ सरकारविरुद्ध बंड केले होते. भाजप यावेळी चौहान यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी कसून नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. योजनेच्या फलकांवर १२ हजार आकडा ठळक नोंदविण्यात आला आहे. दरमहा एक हजार याप्रमाणे वर्षाची एकूण रक्कम महिलांच्या मनावर ठसविण्याचा उद्देश आहे.