
Amritpal Singh : "२०-२५ किलोमीटर पाठलाग केला, पण..." ; अमृतपालच्या अटकेबाबत पंजाब पोलिसांची मोठी माहिती
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस मैदानात उतरली आहे. संपूर्ण पंजाबमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अमृतपालविरुद्ध पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७८ जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमृतपालच्या जवळच्या व्यक्तींचाही समावेश आहे.
पोलिसांनी त्याचा सुमारे अमृतपालचा २०-२५ किलोमीटर पाठलाग केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी पोलिसांना एक नंबर मिळाला असून ते तो नंबर ट्रेस करत आहेत. यासोबत शस्त्रे आणि २ कार जप्त करण्यात आल्या आहेत. यातील एका कारने पोलिसांच्या गाडीला धडक मारली होती.
अमृतपाल सिंह याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करू. कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल, असे जालंधरचे सीपी केएस चहल यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी जप्त केली कार -
पोलिसांच्या शोध मोहिमेदरम्यान अमृतपाल सिंह ज्या वाहनातून पळून गेला होता ते वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची कार आणि पोलिसांच्या गाडीची टक्कर झाली होती. पोलिसांनी त्या वाहनातून ३१५ बोअरचे पिस्तूल, तलवार, वॉकीटॉकी जप्त केली आहे. याशिवाय पंजाब पोलिसांनी बनावट नंबर प्लेटही जप्त केली आहे.
इंटरनेट सेवा बंद -
पंजाब सरकारकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, पंजाबच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रात सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा १८ मार्च ते १९ मार्च पर्यंत बंद राहतील.