esakal | Bihar Election: सत्ता कुणाचीही असो, बिहारमध्ये 'जंगलराज'च!
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar_Election_2020

बिहारच्या मतदानावेळी यंदा खून, मतदानकेंद्रे लुटण्यासारख्या घटनांच्या बातम्या आल्या नसल्याचे भाजपचे म्हणणे असले तरी विधानसभेचा एकूण तोंडावळा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या आमदारांचाच असणार आहे.

Bihar Election: सत्ता कुणाचीही असो, बिहारमध्ये 'जंगलराज'च!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत सत्ता कोणत्याही पक्षाची आली असली तरी तेथे 'जंगलराज' कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. नव्या बिहार विधानसभेत २०१५ च्या तुलनेत तब्बल १० टक्के अधिक गुन्हेगार निवडून आल्याचे समोर आले आहे. विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांपैकी ६८ टक्के म्हणजे सुमारे दोन तृतीयांश आमदारांवर (१६३) गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यातील ५१ टक्के आमदारांवर तर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ओवैसी यांच्या एमआयएमचे १०० टक्के, तर कॉंग्रेसचे ८४ टक्के आमदार कलंकित आहेत.

दरम्यान, बिहारची नवी विधानसभा श्रीमंत असणार आहे. तब्बल १९४ म्हणजे ८१ टक्के नवे आमदार कोट्यधीश आहेत. २४३ आमदारांतील प्रत्येकाचा सरासरी उत्पन्न ४ कोटी ३२ लाख रुपये आहे. उमेदवारी अर्ज भरताना यातील २४१ आमदारांनी स्वतःच प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. भाजपकडून सर्वाधिक ६५ (८९ टक्के), तर राजदचे ६४ (८७ टक्के) आमदार कोट्यधीश आहेत.

मध्य प्रदेशात पोटनिवडणूक जिंकलेल्या भाजपसमोर मोठं आव्हान​

बिहारच्या मतदानावेळी यंदा खून, मतदानकेंद्रे लुटण्यासारख्या घटनांच्या बातम्या आल्या नसल्याचे भाजपचे म्हणणे असले तरी विधानसभेचा एकूण तोंडावळा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या आमदारांचाच असणार आहे. लोकशाही सुधारणा क्षेत्रात काम करणारी एडीआर संस्था व बिहार इलेक्‍शन वॉचच्या अभ्यास पाहणीत बिहार विधानसभेतील गुन्हेगारी आमदारांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. २०१५ मध्ये १४२ (५८) टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आमदार निवडून आले होते. नव्या आमदारांपैकी १९ जणांवर खुनाचे (कलम ३०२), ३१ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे(कलम ३०७), ८ जणांवर महिलांविरुद्ध अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

उमा भारतींना तेजस्वीचं कौतुक; म्हणाल्या, तो राज्याचे नेतृत्व करु शकतो, पण...​

एमआयएमच्या पाचही आमदारांवर गंभीर गुन्हे
एमआयएमच्या झाडून सगळ्या (१०० टक्के) म्हणजे पाचही आमदारांविरुद्ध अत्यंत गंभीर गुन्हेगारी खटले चालू आहेत. कॉंग्रेसचे १९ पैकी १६ म्हणजे ८४ टक्के तर राष्ट्रीय जनता दलाकडून ७४ पैकी ५४ म्हणजे तब्बल ७३ टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आमदार विधानसभेत येणार आहेत. त्याखालोखाल भाजपचे ७३ पैकी ४७ (४७ टक्के), जदयूचे २०(४७ टक्के), भाकपचे (माओ-लेनीन) १० आमदार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांत राजद ४४, भाजप ३५, जदयू आणि कॉंग्रेस प्रत्येकी ११, तर एमआयएमच्या पाचही आमदारांचा समावेश आहे.

- देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)