esakal | Bihar Election : काँग्रेसचे 'ब्राह्मण' कार्ड तर 'सुशांत'च्या चुलत भावाला भाजपकडून तिकीट
sakal

बोलून बातमी शोधा

Congress in Bihar

जात हा घटक बिहारच्या राजकारणात प्रभावी ठरणारा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आजवर दिसून आलं आहे.

Bihar Election : काँग्रेसचे 'ब्राह्मण' कार्ड तर 'सुशांत'च्या चुलत भावाला भाजपकडून तिकीट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभेची निवडणुक ही अत्यंत चुरशीची निवडणुक मानली जाते. या निवडणुकीत जातीय समीकरणांचे गणित ज्या पक्षाला नीटपणे सोडवता येते, तो पक्ष सत्तेच्या राजकारणात बाजी मारण्यात यशस्वी ठरतो, असं म्हणतात. जात हा घटक बिहारच्या राजकारणात प्रभावी ठरणारा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आजवर दिसून आलं आहे. यंदाच्या निवडणुकीतही या समीकरणाचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाकडून केला जातो आहे. 

या निवडणुकीत सत्ताधारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू-भाजप युतीसमोर राजद-काँग्रेस या महाआघाडीचे आव्हान आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता भोगणाऱ्या नितीश कुमारांना कोरोना महामारी, मजूरांचे स्थलांतर आणि महापूर या विषयावर घेरण्याचा प्रयत्न विरोधकांचा असणार आहे. तर अँटी-इन्कम्बसीचे वातावरण मोडून काढून सुशासनाची 15 वर्षे असा प्रचार करुन नितीश कुमार यांचा चौथ्यांदा सत्ता हस्तंगत करण्याचा प्रयत्न आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यास तयार; तेजस्वी यादवांचे नितीश कुमार यांना आव्हान

या पार्श्वभूमीवरच बिहारच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने 24 जागांपैकी 12 जागांवर सवर्णांना तिकीट दिले आहे. याव्यतिरिक्त पक्षाच्या प्रतिमेचा विचार करुन काही अन्य जातीतल्या उमेदवारांनाही तिकीट दिलं आहे. मात्र, 12 सवर्णांना तिकीट देऊन काँग्रेसने ब्राह्मण कार्ड खेळल्याची चर्चा होत आहे. 

काँग्रेसने 12 सवर्णांमध्ये 6 ब्राह्मण, 4 भूमीहार, 1 राजपूत आणि 1 कायस्थ अशा उमेदवारांना तिकीट दिलं आहे. तर अनुसूचित जातीच्या चार उमेदवारांनाही तिकीट दिलं आहे. पक्षाने अतिमागास वर्गातील 2, यादव जातीतील 2 आणि 1 कुर्मी उमेदवाराला मैदानात उतरवलं आहे. 

हेही वाचा - शिवसेनेला बिहारमध्ये ‘तुतारीधारी मावळा’ चिन्ह

तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकूण सहा महिलांसहित 35 उमेदवारांचे नाव पक्षाने घोषित केले आहे. यामध्ये छातापूरचे आमदार नीरज सिंह बबलू यांना पार्टीने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. नीरज सिंह हे अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे चुलत भाऊ आहेत. सुशांत सिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण देशात ताजे आहे. मूळचा बिहारचा असणाऱ्या सुशांतच्या मृत्यूनंतरची सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा आहे. 

बिहारच्या निवडणुका या तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.