esakal | Bihar Election: बिहारचे कळीचे मुद्दे आणि भरकटलेली निवडणूक!
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Election

राष्ट्रीय जनता दलच्या तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली आहे.

Bihar Election: बिहारचे कळीचे मुद्दे आणि भरकटलेली निवडणूक!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बिहार निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहिर केल्या आहेत. आणि आता निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि आश्वासनांची रेलचेल सुरु झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात होणारी ही पहिलीच निवडणूक असून आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रचार आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. बिहारच्या राजकारणात राष्ट्रीय जनता दल , जनता दल युनायटेड, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे पक्ष प्रमुख आहेत. 
 

काय आहेत महत्वाचे मुद्दे?
- कोरोनाचा कहर
सध्या बिहारमधील कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिकट आहे. सध्या संपूर्ण बिहारमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. हॉस्पिटलमधील लोकांना आरोग्यव्यवस्थेकडून आलेला अनुभव खराब आहे. तसेच ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे.
- पुराचा फटका
अलीकडेच आलेल्या पुराने बिहारचे मोठे नुकसान केले आहे. अर्ध्याहून अधिक बिहार यामुळे त्रस्त झालेला होता. सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याची जनभावना असल्याने हादेखील मुद्दा चर्चेत आहे. 
- स्थलांतर आणि बेरोजगारी
बिहारमध्ये रोजगाराच्या फार संधी नसल्याने बरेचशे बिहारी रोजगारासाठी इतर राज्यांत जातात. मात्र कोरोनाच्या कहरामुळे स्थलांतरित झालेले बहुतांश मजूर हे स्वराज्यात परतले आहेत. संपूर्ण भारत लॉकडाऊन असताना हे मजूरांचे लोंढे चालत आपापल्या घरी परतताना त्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. रोजगार गेलेला तर आहेच मात्र, झालेल्या नुकसानीचा मुद्दाही ज्वलंत आहे. 
- कृषी विधेयक 
केंद्र सरकारने तीन कृषी विधेयकात केलेले बदल हा मुद्दा देखील बिहारच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरणार आहे. देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी याविरोधात आवाज उठवला आहे. बिहारमध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी हा मुद्दाही वापरला जात आहे. 
- जातीय समीकरणे
जातीय समीकरणांविना बिहारची निवडणूक नेहमीच अधुरी राहिलेली आहे. इतके सारे प्रश्न आ वासून उभे असतानाही या निवडणुकीतही हे मुद्दे सातत्याने चर्चेत आहेत.  

हेही वाचा - कोविड एक्सेस स्ट्रॅटेजीवर मन की बात असती तर बरं झालं असतं - राहुल गांधी

निवडणूकीतील भरकटलेले मुद्दे 
याआधीच बिहारच्या राजकारणात सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाने जोर धरला आहे. या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सरकारवर निशाणा साधताना याचा आगामी बिहारच्या निवडणुकीत कसा उपयोग करता येईल या प्रयत्नात भाजप आणि जदयू असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. जनता दल युनायटेड या पक्षाने सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर प्रचारात आणले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच बिहार दौराही केला होता. या निवडणुकीत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि राजदच्या रघुवंश प्रसाद सिंह यांच्या अपमानाचाही मुद्दा सत्ताधाऱ्याकडून लावून धरला जातोय. राजदचे जेष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन आजारामुळे नव्हे तर पक्षाने केलेल्या अपमानामुळे झालं आहे. बिहारला समृद्ध बनवण्याचं त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, वक्तव्य जदयूच्या जयकुमार सिंह यांनी केलं होतं. 

यादरम्यानच राजदकडून रोजगाराच्या मुद्यावर लक्ष वेधलं गेलं. राष्ट्रीय जनता दलच्या तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी 10 लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिलं आहे. 

 हेही वाचा - 'आधी घरात दिवा लावा नंतर...'; संयुक्त राष्ट्रातील मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींची टीका

नितीश कुमार गेल्या 15 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजप, काँग्रेस, राजद, लोजपा अशा सर्वच पक्षांसोबत त्यांनी सत्ता चालवली आहे. आपण बिहारचा विकास केला असल्याचा दावा जरी असला तरीही 'एंटी इन्कम्बसी'चा मुद्दाही चर्चेत आहे. 

बिहार निवडणुकीचं मतदान तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबर, दुसरा टप्पा ३ नोव्हेंबर आणि तिसरा टप्प्याचं मतदान ७ नोव्हेबर रोजी होणार आहे. तर १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.