'आधी घरात दिवा लावा नंतर...'; संयुक्त राष्ट्रातील मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींची टीका

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काल भाषण केलं. त्या भाषणात केलेल्या वक्तव्यावरुन एमआयएमचे खासदार असददुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक चिंताजनक झालेली असताना हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं आधी काहीतरी करा आणि मग नंतर जगासाठी दिवे लावा अशी कडवट टिका ओवैसी यांनी ट्विटरवर केली आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटरवरून म्हणजेच PMO India वरुन काल संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केलेल्या भाषणातील मुद्दे ट्विट करुन टाकले होते. यामध्ये म्हटलंय की, भारताने नेहमीच विश्वकल्याणाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं आहे. आपले 50 शूर जवान भारताने जगातील विविध शांतता मोहिमेवर पाठवले आहेत. संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार भारताने केला आहे. या महामारीच्या खडतर काळातही भारताच्या  फार्मा इंडस्ट्रिने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषधे पाठवली आहेत. लशीचे उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा देश म्हणून आज मी जगभरातील समुदायांना आणखी एक आश्वासन देऊ इच्छितो. भारतची लस निर्मितीची आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवजातीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल. 

नरेंद्र मोदींच्या या ट्विटला रिप्लाय करत ओवैसी यांनी जोरदार टिका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, "सर, काय आपलं सरकार 80 हजार कोटी रुपयांची तजवीज करेल? थाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा... दिवे विझवा, फक्त 21 दिवस...  आणि आता 93,379 मृत्यू... सर, आधी घरात तरी दिवे लावा... नंतर..."

असं म्हणत त्यांनी जगासाठी दिवे नंतर लावा, आधी भारतातील हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं काहीतरी करा, असा खोचक सल्ला दिला आहे. भारताला लशीच्या निर्मितीसाठी आणि वितरणासाठी 80 हजार कोटी रुपये लागणार असून त्याच्या तजवीजीबाबत काय, असा प्रश्न काल सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावला यांनी केला होता.

त्यांच्या याच प्रश्नाचा हवाला घेत ओवैसी यांनी 80 हजार कोटींबाबत प्रश्न विचारला आहे. तसेच, मोदींनी देशवासीयांना कोरोनाला रोखण्यासाठी फक्त 21 दिवस घरात रहा असे आवाहन केले होते. थाळ्या वाजव्या, दिवे लावा हे सारे करुनही आज मृतांची संख्या 90 हजारच्या पार  गेलेली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर जगासाठी दिवे नंतर लावा, आधी घरातला अंधाराचं बघा... असा खोचक सल्ला ओवैसी यांनी मोदींना दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com