कोविड एक्सेस स्ट्रॅटेजीवर मन की बात असती तर बरं झालं असतं - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

कालच सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विट करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लसवितरणाच्या उपायांबाबत प्रश्न विचारले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात'द्वारे देशवासीयांसोबत संवाद साधला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आदर पुनावला यांनी विचारलेल्या प्रश्नाचा हवाला देऊन या प्रश्नाच्या उत्तराची वाट भारत बघत आहे, असं म्हटलं आहे. आजच्या 'मन की बात'चा विषय जर कोविड अॅक्सेस स्ट्रॅटेजीचा असता तर? असा सवाल त्यांनी केला आहे.

कालच सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विट करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लसवितरणाच्या उपायांबाबत प्रश्न विचारले होते. त्यांनी म्हटलं होतं की, लस आल्यानंतर ती लस विकत घेऊन प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी 80 हजार कोटींचा खर्च येणार आहे. तर पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे इतके रुपये आहेत का? आपल्याला आता या आव्हानाचा सामना करायचा आहे. असं आदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटद्वारे विचारलं होतं.

हेही वाचा - कृषी विधेयकावेळी राज्यसभेत नेमकं काय घडलं? रिकाम्या बाकड्यांच्या साक्षीनं ठरलं शेतकऱ्यांचं भविष्य

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पीएमओ इंडियालाही टॅग केलं होतं. पुढील ट्विटमध्ये त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण हे  लक्षात घेऊन त्यापद्धतीची योजना आपल्याला तयार करावी लागेल. देशाची एकूण गरज लक्षात घेता लशीची खरेदी आणि वितरण करण्यासाठी देश आणि परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल. 

याच ट्विटमधील प्रश्नांच्या बातमीचा मथळा आपल्या ट्विटमध्ये शेअर करत राहुल गांधी यांनी आदर पुनावला यांच्या प्रश्नाला दुजोरा दिला आहे. त्या प्रश्नाकडे लक्ष वेधत त्यांनी हा प्रश्न अधिक महत्वाचा असून मोदी सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करायला हवी, असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. आजच्या मन की बात मध्ये जर या कोविड अॅक्सेस स्ट्रॅटेजीवर मोदींजीकडून बोलणं झालं असतंतर ते अधिक योग्य ठरलं असतं. आदर पुनावाला यांनी उपस्थित केलेल्या या योग्य प्रश्नाच्या उत्तराची वाट भारत कधीपर्यंत  पाहणार आहे? असा सवाल देखील त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. 

हेही वाचा - कंदहारचा डाग लागलेला, वाजपेयींचा विश्वासू सहकारी

पुण्यातील  सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी तिच्या उत्पादनाची आणि वितरणाची जबाबदारी घेतली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेकासोबत याबाबतचा करार सिरम इन्स्टिट्यूटने केला आहे. सध्या भारतात आणि जगात इतर ठिकाणीही ऑक्सफर्डच्या या लशीच्या चाचण्या सुरु आहेत. भारतासह जगभरात कोरोनाच्या उद्रेकाने हाहाकार माजवला आहे. लस हाच एकमेव उपाय असून प्रभावी लशीच्या निर्मितीची वाट संपूर्ण जग बघत आहे. मात्र लस निर्माण झाल्यानंतर ती उत्पादीत करुन वितरण करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. भारतासारख्या मोठ्या देशात जिथे कोरोनाचा फटका आधीच बसला आहे तिथे लशीच्या वितरणाचे आव्हान हे मोठे असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how long will the country wait for the government reply on Adar Poonawallaa question rahul gandhi