बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे.

पटना - बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून सर्व पक्षांच्या बैठका सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि आरजेडीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं समजते. काँग्रेस नेता राजेश राठोड यांनी म्हटलं की, काँग्रेस आणि आरजेडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असून त्यांनी ठरवलं आहे. लवकरच याचा खुलासा केला जाईल. तसंच वाल्मीकिनगर मतदारसंघ आपलाच असल्याचं त्यांनी सांगितलं. 

महाआघाडीमध्ये मांझी यांच्या जाण्याने आता उपेंद्र कुशवाहा यांच्यामुळे थोडं संभ्रमाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस यावेळी आरजेडीला जास्त जागा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 58 आणि 1 लोकसभा पोटनिवडणूक अशी ऑफर असल्याच्या चर्चेवर आरजेडी आमदार विजय प्रकाश यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, महाआघाडीत कोणताही वाद नाही आम्ही एक आहे. आमचे वरिष्ठ नेते कोणता पक्ष किती जागा लढणार हे ठरवणार आहे. तसंच सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन आमचे नेते तेजस्वी यादव पुढे जातील आणि आम्ही नक्कीच सर्वाधिक जागा सहज जिंकू असाही विश्वास विजय प्रकाश यांनी व्यक्त केला. 

हे वाचा - Farm Bill Protest - इंडिया गेटवर ट्रॅक्टर जाळणाऱ्या 5 जणांना घेतलं ताब्यात

बिहारमध्ये आरजेडीने विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीमध्ये काँग्रेसला 58 जागांची ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय पोटनिवडणूक होत असलेल्या वाल्मिकीनगरची लोकसभेची सीट काँग्रेसला देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे. तारखा जाहीर झाल्यानं आता जागा वाटपाची घाई तर सुरू आहेच. त्यासोबत मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याचं आव्हान पक्षांसमोर आहे. 

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या एनडीएकडे 130 संख्याबळ आहे. सत्ताधारी जदयुचे 69 तर भाजपचे 54 आमदार आहेत. याशिवाय एलजेपी 2 आणि इतर 5 जणांचा समावेश आहे. तर विरोधक असलेल्या आरजेडीकडे 73, काँग्रेसकडे 23, सीपीआयकडे 3 आणि इतर 3 असून 12 जागा रिकाम्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar assembly election rjd and congress seat formula