दुखापत झाली एका हाताला अन् प्लॅस्टर घातले दुसऱयाला

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

एक मुलगा आंब्याच्या झाडावरून खाली पडल्यामुळे डावा हात फॅक्चर झाला. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी चक्क तपासणी न करता उजव्या हाताला प्लास्टर घातले.

दरभंगा (बिहार): एक मुलगा आंब्याच्या झाडावरून खाली पडल्यामुळे डावा हात फॅक्चर झाला. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी चक्क तपासणी न करता उजव्या हाताला प्लास्टर घातले. डॉक्टरांचे दुर्लक्ष व गलथानपणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

बिहारच्या दरभंगामधील एका मोठया सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी अक्षरक्ष: कहर केला आहे. अपघातग्रस्त मुलाच्या हाताला प्लॅस्टर घातल्याचे छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले असून, डॉक्टरांवर टीका केली जात आहे.

सात वर्षांचा फैजान हा मुलगा झाडावरुन खाली पडला होता. उपचारासाठी त्याला दरभंगाच्या मेडीकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरने फैझानच्या डाव्या हाताऐवजी उजव्या हाताला प्लास्टर घातले. एक्स रे रिपोर्टमध्ये मुलाचा डावा हात फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट दिसत होते. तरीही डॉक्टरने उजव्या हाताला प्लास्टर घातले. डॉक्टर प्लास्टर घालत असताना फैझान त्यांना तुम्ही चुकीच्या हातावर उपचार करत आहात हे सांगत होता. पण डॉक्टरांनी त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, फैझानच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले असून प्लॅस्टर घातलेल्या डॉक्टरांकडे खुलासा मागितला आहे. शिवाय, जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Boy Gets His Left Hand Fractured, Doctors Cast Plaster On Right