नितीश कुमारांनी 'कमळा'त भरला रंग

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पाटणा 'बुक फेअर'मध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या बउआ देवी यांनी एका पेपरवर कमळाचे चित्र काढले होते. त्यावर त्यांनी नितीश कुमार यांची सही मागितली. यावेळी नितीश यांनी कमळामध्ये लाल रंग भरत सही केली.

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात कमळाच्या चित्रात रंग भरल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकांवेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे. आता भाजपचे राजकीय चिन्ह असलेल्या कमळामध्ये रंग भरताना नितीश कुमार दिसले. पाटणा 'बुक फेअर'मध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या बउआ देवी यांनी एका पेपरवर कमळाचे चित्र काढले होते. त्यावर त्यांनी नितीश कुमार यांची सही मागितली. यावेळी नितीश यांनी कमळामध्ये लाल रंग भरत सही केली. यानंतर वेगवेगळे अर्थ काढत हे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) पक्षाची लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षाशी आघाडी आहे. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या सुरु आहेत.

Web Title: Bihar CM Nitish Kumar paints a lotus drawn by an artist at the inauguration of Patna Book Fair