esakal | भाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

bjp expels 2 sitting mla and 5 leaders from party

दोन विद्यमान आमदारांसह आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक माजी खासदार आणि चार माजी आमदार आहेत.

भाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पटना - बिहारच्या निवडणुकीची (Bihar Election 2020) रंगत आता वाढत चालली आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणूक आली असतानाच आता भाजपने  (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच दोन विद्यमान आमदारांसह सात नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी ही कारवाई करत सात जणांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं. 

हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये रक्सौलचे आमदार अजय कुमार सिंह आणि बगहाचे आमदार आर एस पांडेय यांचा समावेश आहे. या दोघांनाही पक्षाने तिकिट नाकारल्यानं बंडखोरीचं हत्यार काढलं होतं. दोन विद्यमान आमदारांसह आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक माजी खासदार आणि चार माजी आमदार आहेत. विश्वमोहन कुमार या सुपौलच्या माजी खासदारांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसंच विजय गुप्ता, प्रदीप दास, विभास चंद्र चौधरी, किशोर कुमार मुन्ना या माजी आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 

हे वाचा - सहा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी राहुल गांधींचे मौन; सितारमण यांचा निशाणा

भाजपने याआधी 12 ऑक्टोबरला बिहारमधील बंडखोर नेत्यांवर कारवाई करताना पक्षातून हकालपट्टी केली होती. ज्या नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई झाली होती त्यात राजेंद्र सिंह, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रविंद्र यादव, श्वेता सिंह, इंदु कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर आणि अजय प्रताप यांचा समावेश आहे.

बिहारमध्ये भाजप 112 जागांवर लढत आहे. त्यांचा सहकारी पक्ष जदयू 115 जागा लढवत आहे. भाजपने त्यांच्या जागांपैकी नऊ जागा मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीला दिल्या आहेत. तर जदयूने जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम पार्टीला सात जागा दिल्या आहेत.

हे वाचा - Bihar Election: 10 लाख सरकारी नोकऱ्या, कर्जमाफी, बेरोजगारी भत्ता; तेजस्वींचीही आश्वासनांची खैरात

बिहारमध्ये एकूण 243 जागांसाठी निवडणूक होत असून तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. याअंतर्गत 28 ऑक्टोबरला 71 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तीन नोव्हेंबरला 94 जागांसाठी तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला 78 जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार असून मतदारांचा कौल समजणार आहे.