VIDEO - मतांसाठी भाजप मंत्र्याने काँग्रेस कार्यकर्त्यासमोर टेकले गुडघे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकून बसत मत मागताना नेता दिसत आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. नेते आणि राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मत मागण्यासाठी नेते आता कार्यकर्त्यांच्या पाया पडण्यासही कमी पडत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकून बसत मत मागताना नेता दिसत आहे. मध्य प्रदेशातील प्रद्युम्न सिंह तोमर यांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये ते काँग्रेस कार्यकर्त्याला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

शिवराज सरकारमध्ये उर्जा मंत्री असलेले प्रद्युम्न सिंह तोमर काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. त्याठिकाणी कार्यकर्त्याच्या समोर गुडघ्यावर ते बसल्याचं चित्र बघायला मिळालं. मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना नेत्यावर टीका करताना म्हटलं की, नेते विकले जाऊ शकतात पण कार्यकर्ते नाही. पाहा कसा एक विकलेला मंत्री काँग्रेसच्या कार्यकर्त्या समोर गुडघे टेकून बसला आहे. नेते बिकाऊ असू शकता मात्र प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता टिकाऊ आहे.

पाठिंबा मिळवण्यासाठी कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकलेल्या नेत्याचा व्हिडिओ सध्या मध्य प्रदेशात चर्चेत आहे. यामुळे अशीही चर्चा होत आहे की, काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याची अवस्था किती वाईट झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही व्हिडिओ ट्विट केला आहे. तसंच म्हटलं की हाच फरक आहे बिकाऊ आणि टिकाऊ मध्ये. काँग्रेसला त्यांच्या टिकाऊ कार्यकर्ते आणि नेत्यांची काळजी कशी घ्यायची ते माहिती आहे. आता नेत्यांनी गुडघे टेकले आहेत पण तीन नोव्हेंबरपर्यंत साष्टांग दंडवत घालतील असंही दिग्विजय सिंह यांनी म्हटलं. 

हे वाचा - भाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी

मध्य प्रदेशात इमरती देवी यांच्यासह 22 आमदार भाजपमध्ये गेले होते. यामुळे काँग्रेसचे कमलनाथ यांच्या नेतृत्व अल्पमतात आले होते. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र त्याआधीच कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील 28 विधानसभेच्या जागांसाठी तीन नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेतली जात आहे. याची मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh minister pradyumn singh tomar -bows-down front of-congress-worker video