esakal | Bihar Election : ...तर नितीशकुमार उद्या तेजस्वींसमोरही नतमस्तक होतील, चिराग पासवान यांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

chirag nitish

मुख्यमंत्री पदी असूनही यांच्याकडे लोकांच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाहीये, अशीही टीका चिराग पासवान यांनी केली आहे.

Bihar Election : ...तर नितीशकुमार उद्या तेजस्वींसमोरही नतमस्तक होतील, चिराग पासवान यांचा टोला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीमुळे ऐन थंडीतही राज्यात गरमागरम वारे वाहत आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षासोबत भाजपा उभी असली तरीही राजद-काँग्रेस महागठबंधनने मोठे आव्हान उभे केले आहे. एनडीएतील घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीनेही राज्यात फारकत घेत नितीश कुमारांविरोधात दंड थोपटला आहे. लोजपाचे चिराग पासवान हे मोदींशी निष्ठा व्यक्त करत दुसऱ्या बाजूला नितीश कुमार यांना धारेवर धरत आहेत. एकेकाळी मोदींवर तोंडसुख घेणारे नितीश कुमार आज मोदींसमोर हात जोडून उभे आहेत, कदाचित उद्या तेजस्वी-लालूंसंमोरही ते हात जोडतील, अशी टीका चिराग पासवान यांनी केली आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा - Bihar Election : नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री मात्र एकदाही विधानसभेवर नाही

चिराग पासवान नितीश कुमारांना उद्देशून म्हणाले की, ज्याप्रकारे आपण पंतप्रधान मोदींना कोसताना थकत नव्हता आणि आता त्यांच्यासोबत मंचावर नतमस्तक होताना थकत नाही आहात. हे आपल्याला असलेल्या खुर्चीविषयीची लालसा आणि सत्तेविषयीचा लोभ दाखवून देतं. आता 10 तारखेनंतर हे नितीश कुमार तेजस्वी यादवांसमोर नतमस्तक होतानाही दिसतील. 

मुख्यमंत्री पदी असूनही यांच्याकडे लोकांच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाहीये. सगळ्यात कमकुवत आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आपणच आहात. ना आपण राज्यातील समस्यांना तडीस लावत आहात. आणि प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे एक तरी कारण उपलब्ध असतंच की हा विषय तर केंद्र सरकार बघेल, हे तर इलेक्शन कमीशन बघून घेईल, हा मामला तर राज्यपालांच्या अंतर्गत येतो, जर सगळ्या गोष्टी बाकीच्यांनीच बघायच्या आहेत तर आपण या खुर्चीवर कशासाठी बसलेले आहात? गेल्या 15 वर्षांपासून कशासाठी हे खुर्चीला चिकटून बसलेले आहेत? असा सवालही त्यांनी केला. 

हेही वाचा - Bihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका

नितीश कुमार यांच्यावर हरलाखी येथील सभेत तीन तारखेला कांदे फेकण्यात आले होते. त्यावरील प्रतिक्रीया विचारली असता चिराग पासवान म्हणाले की, कांदे फेकल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ती अजिबात योग्य नव्हती. कांदे फेकणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे बोलवून त्यांच्या समस्यांबद्दल विचारपूस करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भडकवले आणि म्हणाले 'फेको फेको और फेको.' त्यांनी ज्या प्रकारे या घटनेवर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी त्यांचे अजिबात कौतुक करीत नाही, असंही ते म्हणाले.