esakal | Bihar Election : 'नो कन्फ्यूजन', नितीशकुमारच असतील मुख्यमंत्री; मोदींचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

bjp & jdu

नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला कमी जागा मिळाल्यामुळे एनडीएमध्ये भाजप आता  मोठा भाऊ ठरला आहे.

Bihar Election : 'नो कन्फ्यूजन', नितीशकुमारच असतील मुख्यमंत्री; मोदींचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Bihar Election 2020

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने बाजी मारुन एनडीएमध्ये 74 जागांसह मोठा भाऊ बनण्याची तयारी केली आहे. जेडीयूला या निवडणुकीत फक्त 43 जागा मिळाल्या आहेत. असं असलं तरीही एनडीएकडून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील याबाबत कोणतेही कन्फ्यूजन नसल्याचे भाजपने म्हटलंय. राज्याचे उप मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी यासंदर्भात म्हटलंय की, नितीशजीच मुख्यमंत्रीपदी राहतील. कारण ते आमचे वचन होते. याबाबत कोणताही भ्रम नाही. त्यांनी पुढे म्हटलं की, निवडणुकीत असं होतंच, कुणी जास्त जागा जिंकतं तर कुणी कमी पण आम्ही समान भागिदार आहोत.

हेही वाचा - Bihar Election : अटीतटीचा सामना; जेडीयूकडून अवघ्या 12 मतांनी हारला राजदचा उमेदवार
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला कमी जागा मिळाल्यामुळे एनडीएमध्ये भाजप आता  मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री बनतील की नाही, याबाबत शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, आता भाजपने याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चेला  पूर्णविराम लागला आहे. भाजपाने केवळ आपल्या जोरावर बिहारमध्ये कधी सत्ता गाजवली नाहीये. तसेच नितीश कुमार यांच्याशिवाय भाजप सत्तेत राहू शकत नाही. मात्र, यावेळच्या निवडणुकीत भाजप जेडीयूपेक्षा अनेक जागांवर आघाडीवर आहे. सुत्रांचं असं म्हणणं आहे की, नितीश कुमार यांच्या या चौथ्या कार्यकाळात एनडीएमधील सत्तेच्या शक्तीचा समतोल थोडा वेगळा असण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - Guinness Record: सहा वर्षांचा अरहम ठरला जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत सध्याच्या निकालानुसार 75 जागांसह राजद हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपा 74 जागांसह दुसऱ्या स्थानावर असणार आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष 43 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सत्ताधारी एनडीएला 125 जागा मिळून बहुमत प्राप्त झालं आहे. तर विरोधकांना 110 जागा मिळाल्या आहेत. अशा अनेक जागा आहेत जिथे खुप कमी फरकाने निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. हिलसा मतदारसंघात तर जेडीयूच्या उमेदवाराला राजदच्या उमेदवारापेक्षा फक्त 12 मतांनी विजय प्राप्त करता आला आहे.