esakal | Bihar Election : अटीतटीचा सामना; जेडीयूकडून अवघ्या 12 मतांनी हारला राजदचा उमेदवार
sakal

बोलून बातमी शोधा

Tejshwi yadav chirag paswan

राजदने आरोप केलाय की, अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या घरातून फोन आला आणि मग नंतर अचानक आमचा उमेदवार निव्वळ 1२ मतांना हारल्याचे घोषित करण्यात आले. 

Bihar Election : अटीतटीचा सामना; जेडीयूकडून अवघ्या 12 मतांनी हारला राजदचा उमेदवार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Bihar Election 2020

बिहार विधानसभेची यंदाची ही निवडणुक अत्यंत चुरशीची झालीय. महागठबंधन आणि एनडीए या दोघांच्या दरम्यान अटीतटीचा सामना पहायला मिळाला. मतमोजणी  पूर्व सर्व अंदाजांमध्ये राजदच्या तेजस्वी यादव यांच्या बाजूनेच कल दाखवला गेला होता. मात्र, सरतेशेवटी एनडीएला बहुमत प्राप्त करण्यात यश मिळालं आहे. असं असलं तरीही अनेक जागांवर 1000 पेक्षा कमी फरकांनी या निवडणुकीत घासाघीस झाली आहे. इतकंच नव्हे तर एका जागेवर निव्वळ 12 मतांनी राजदचा एक उमेदवार पराभूत झाल्याचे पहायला मिळाले आहे. 

रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु होती. बऱ्याच जागांवर अत्यंत कमी मार्जिनने अटीतटीचा संघर्ष सुरु होता. बिहारमधील हिलसा मतदारसंघात फक्त 12 मतांनी जेडीयूचा उमेदवार जिंकला आहे. राजदच्या उमेदवाराला निव्वळ 12 मते कमी पडल्याने पराभव पत्करावा लागला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूच्या कृष्णकुमारी शरण यांना 61,848 मते मिळाली आहेत तर राजदच्या शक्ती सिंग यादव यांना 61,836 मते मिळाली आहेत. म्हणजे फक्त 12 मतांच्या फरकाने ही निवडणूक जेडीयूने जिंकली आहे. 

हेही वाचा - Guinness Record: सहा वर्षांचा अरहम ठरला जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

जेंव्हा वेबसाईटवर हिलसा मतदारसंघात अजूनही मतमोजणी सुरु असल्याचे दाखवले गेले तेंव्हा राजदने आरोप केला की, चुकीच्या पद्धतीने जेडीयू जिंकल्याचे घोषित करण्यात आले आहे. कारण, 500 हून अधिक मतांनी उमेदवार जिंकल्याचे जेडीयूने घोषित केले होते. राजदचे यासंदर्भात ट्विट करुन एक जबरदस्त आरोप केला आहे. त्यांनी म्हटलंय की, रिटर्निंग ऑफिसरने राजदच्या उमेदवाराचा 547 मतांनी विजय झाल्याचं घोषित केलं होतं. त्यांनी जिंकल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी वाट बघायला लावली. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या घरातून फोन आला आणि मग नंतर अचानक राजदचा उमेदवार निव्वळ 12 मतांना हारल्याचे घोषित करण्यात आले. 

हेही वाचा - Bihar Election : 'देशाला दिशाभूल करणाऱ्या लोकांना मिळालेला हा धडा'

जेडीयूच्या उमेदवाराला 232 पोस्टल मते मिळाली तर राजदच्या उमेदवाराला 233 पोस्टल मते मिळाली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारच्या दबावामुळे आमच्या अनेक उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जात नव्हते. राजदने असा दावा केलाय की महागठबंधनने 110 नव्हे तर 119 जागी विजय प्राप्त केला आहे. रात्री उशीरा झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने जाहीर केले की आमच्यावर कोणाचाही, कसलाही दबाव नव्हता.