Bihar Opinion Poll: नितीशकुमारांवर भाजप ठरणार वरचढ? एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

आरजेडीच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला केवळ 76 जागाच मिळू शकतात. इतर 7 जागांपैकी 5 जागा या चिराग पासवान यांच्या एलजेपीच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार राज्यात पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीएच्या बाजूनेच आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार बिहारमधील एकूण 243 विधानसभा मतदारसंघापैकी 160 जागांवर एनडीएचा विजय होऊ शकतो. 

तर आरजेडीच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला केवळ 76 जागाच मिळू शकतात. इतर 7 जागांपैकी 5 जागा या चिराग पासवान यांच्या एलजेपीच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. पक्षांनुसार एनडीएतील 160 जागांपैकी भाजपच्या खात्यात 85, जेडीयूला 70, हम आणि व्हीआयपीला 5 जागा मिळू शकतात. तर महाआघाडीमध्ये आरजेडीला 56, काँग्रेसला 15 आणि डाव्या पक्षांना 5 जागा मिळू शकतात. 

हेही वाचा- Bihar Election : शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत अद्याप चर्चा नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

या सर्वेमध्ये नागरिकांना काही प्रश्नही विचारण्यात आले होते. त्यात लोकांना या निवडणुकीत कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे असा प्रश्न विचारण्यात आले होता. यामध्ये सुमारे 49 टक्के जणांनी रोजगार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले. तर 12.9 टक्के लोकांनी वीज, पाणी आणि रस्ते सारखे मुद्दे उपस्थित केले. 8.7 टक्के लोकांनी भ्रष्टाचार मुद्दा असल्याचे म्हटले तर 7.1 टक्के लोकांनी महिला सुरक्षा आणि 6.7 टक्के लोकांनी शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. 

तर सध्याच्या नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारच्या कामगिरीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 43.6 टक्के मतदारांनी खराब कामगिरी असल्याचे म्हटले. तर 29 टक्के मतदारांनी चांगली तर 27.5 जणांनी साधारण कामगिरी असल्याचे मत नोंदवले. 

हेही वाचा- 'मोबाईल रेडिएशन कमी करायचंय? गायीच्या शेणाची चीप वापरा'

टाइम्स नाऊ-सी वोटर बिहार ओपिनियन पोल

एकूण जागा- 243

एनडीए-160

भाजप- 85

जेडीयू- 70

हम, व्हीआयपी- 5

महाआघाडी- 76

आरजेडी- 56

काँग्रेस-15

डावे-5

अन्य-7 (एलजेपी 5)

एबीपी आणि सी व्होटर ओपिनियन पोलमध्येही एनडीएला आघाडी

यापूर्वी एबीपी न्यूज आणि सी व्होटरकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्येही एनडीएची सत्ता पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात एनडीएला 141 ते 161 जागा मिळू शकतात. यूपीएला 64 ते 84 जागा मिळू शकतात. इतर पक्षांच्या खात्यात 13 ते 23 जागा जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election 2020 opinion poll Times now and C Voter Survey NDA Nitish Kumar BJP