esakal | Bihar Election : शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत अद्याप चर्चा नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay raut

शिवसेना बिहारमध्ये 40 ते 50 जागांवर लढणार आहे.

Bihar Election : शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत अद्याप चर्चा नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अत्यंत चुरशीची समजली जाणारी ही निवडणूक बिहारच्या भविष्यासाठी निर्णायक समजली जात आहे. बिहारचे प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत संपुर्ण ताकदीने उतरले आहेतच. मात्र, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनीही बिहारमध्ये आपली ताकद आजमावण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन पक्ष आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील अशी चर्चा आहे. दरम्यान बिहारमध्ये राष्ट्रवादीशी युती होणार का या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना बिहारमध्ये 40 ते 50 जागांवर लढणार आहे. अजूनपर्यंत तरी कुणासोबतही युती झालेली नाही. मी पुढच्या आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. काही स्थानिक पक्ष आमच्याशी याबाबत चर्चा करु इच्छित आहेत. त्यातील एक जन अधिकार पार्टी या पक्षाचे पप्पू यादव आमच्याशी बोलू इच्छित आहेत. 

हेही वाचा - 'मोबाईल रेडिएशन कमी करायचंय? गायीच्या शेणाची चीप वापरा'


बिहारमध्ये महाराष्ट्रातील मोठे प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहेत. या दोन्हीही पक्षांची महाराष्ट्रात आघाडी आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील निवडणुकांमध्येही हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. या दोन्ही पक्षांत याबाबत चर्चा सुरु असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, अद्याप तरी या दोन्ही पक्षात याबाबत एकमत नसल्याचीच माहिती आहे.

शिवसेनेच्या चिन्हाचा संभ्रम

बिहारमधील सत्ताधारी असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेतला होता. याचं कारण की जेडीयू या पक्षाचे निवडणूक चिन्ह बाण हे आहे. झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे चिन्ह देखील धनुष्यबाण आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होतो, असा जेडीयूचा आक्षेप आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह मिळाले आहे.  मात्र, या बिस्कीट चिन्हावर शिवसेनेने हरकत घेतली आहे. अद्यापही याबाबत निर्णय झाला नाहीये. 

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासात 55,342 नवे रुग्ण; 706 लोकांचा मृत्यू

बिहार विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत जेडीयू आणि भाजप यांच्या एनडीएविरोधात राजद आणि काँग्रेसची महाआघाडी उभी आहे.