Bihar Election 2020 : पासवान यांचे गाव अंधारातच! 

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात दरवर्षी अनेक घरे पाण्याखाली जातात. बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून चिराग पासवान यांचा चेहरा समोर आणला जात असला तरी पासवान यांच्या आजोबाच्या घराकडे जाणारे रस्ते मात्र खराबच आहेत.

पाटणा : कोठून आलात बाबानों. प्रत्येक जण हेच विचारत होते. का आलात? त्याचे उत्तरही दिसत होते. म्हणायला नुसता रस्ता, पण जागोजागी चिखल, खड्डे, धूळीचे साम्राज्य. बिहार फर्स्ट म्हणजे काय आणि कशाचे बिहार फर्स्ट. आमच्या भागात शाळा नाही. प्रत्येक पावसाळ्यात आणि महापुरात बंद होणारी प्राथमिक शाळा आहे. रात्र काय आणि दिवस काय. सर्व दिवस सारखेच. कारण विजेचा पत्ताच नाही. कोणीही विकासाबाबत बोलत नाही. या गावात कोणीही पासवान कुटुंबाबाबत एक शब्द बोलत नाही. काही ज्येष्ठ मंडळी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु उगाचाच वाद नको, म्हणून बोलणे टाळतात. 

खगाडिया जिल्ह्यातील याच गावात जन्मलेले दिवंगत रामविलास पासवान पुढे केंद्रीय मंत्री बनले. एकदा नाही तर अनेकदा. रामविलास पासवान यांच्यामुळे शहरबन्नी गाव प्रकाशझोतात आले. परंतु तेथे विकास नावाची गोष्टच नाही. रामविलास पासवान यांच्या निधनाची वार्ता कळताच गावकऱ्यांना धक्का बसला. त्यांचे पार्थिव गावात आणले जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु पाटण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा मुख्यालय खगाडिया येथून 23 किलोमीटर अंतरावर शहरबन्नी गाव. शहरबन्नीला जाणारा म्हणायला रस्ता आहे. परंतु, महापुरात टिकेल की नाही, याची खात्री नाही. पूर आला किंवा त्याचे प्रमाण कमी राहिले तर नौकेचाच आधार घ्यावा लागतो.

Bihar Election: रविशकुमार यांच्या भावाला काँग्रेसची उमेदवारी

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात दरवर्षी अनेक घरे पाण्याखाली जातात. बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून चिराग पासवान यांचा चेहरा समोर आणला जात असला तरी पासवान यांच्या आजोबाच्या घराकडे जाणारे रस्ते मात्र खराबच आहेत. गावातील मुख्य रस्ता सोडला तर सगळीकडे पाणीच पाणी. पुतणे शंभू पासवान गावात राहतात, पण ते काही बोलत नाहीत. पासवान यांचे बालपणीचे मित्र रामविलास यादव देखील काहीच बोलत नाहीत. आम्ही काही बोललो तर उगाचच वाद निर्माण होईल, असे त्यांना वाटते. 
 
Bihar Election: डॉ. मसकूर उस्मानींना तिकीट मिळाल्याने खळबळ; काँग्रेसला घरचा आहेर

पासवान यांच्या आई-वडिलांच्या नावाने स्मारक 

दिवंगत रामविलास पासवान यांचे आई-वडिल आणि काका-काकू यांच्या नावाने स्मारक भवन गावात उभारले आहे. तेथे काम करणारा विष्णदेव पंडित यांनी सांगितले की, जवळपास दहा वर्षापूर्वी रामविलास पासवान हे आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी आले होते. त्यानंतर मागील वर्षी एकदा आले होते. स्थानिक ग्रामस्थ मुकेश यादव म्हणाले की, पासवान कुटुंबांनी गावासाठी काही केले नाही. कोणताही विकास केला नाही.त्याचवेळी अन्य एका व्यक्तीने म्हटले की, आता चिराग यांच्याकडून अपेक्षा बाळगू. छापून, लिहून काही होणार नाही. उगाचाच आम्ही अडचणीत येऊ, असा गावकऱ्यांचा सूर होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election 2020 story ramvilas paswan village seharbanni faces ignorance