esakal | Bihar Election: डॉ. मसकूर उस्मानींना तिकीट मिळाल्याने खळबळ; काँग्रेसला घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar_Election_Maskoor_Usmani

उस्मानी हे दरभंगा जिल्ह्यातील आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नागरिक नोंदणी सूची (एनआरसी) यांच्याविरोधातील आंदोलनात ते अग्रभागी होते.

Bihar Election: डॉ. मसकूर उस्मानींना तिकीट मिळाल्याने खळबळ; काँग्रेसला घरचा आहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Bihar Election : पाटणा : बिहारमधील जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या उस्मानी यांना देशद्रोही आणि जिनासमर्थक ठरवले जात आहे. माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांचे नातू ऋषी मिश्रा यांना तिकिट नाकारून उस्मानी यांना देण्यात आले. त्यामुळे ऋषी यांनी बंडाचे निशाण फडकावत पक्ष नेतृत्वाने या प्रकरणी जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. उस्मानी यांना उमेदवारी दिल्यावरुन काँग्रेसला विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. 

मी तर सगळ्यांनाच भेटतो; खडसेंच्या पक्ष प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया​

काँग्रेस नेत्याचा पक्ष प्रमुखावर हल्लाबोल

एकवेळ मला तिकीट देऊ नका, पण उस्मानीसारख्या देशद्रोह्याला तिकीट का देता, अशी भूमिका ऋषी यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, मला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही याचे दु:ख वाटत नाही. त्यांनी उमेदवारी दुसऱ्या कोणाला तरी द्यायला हवी होती. परंतु, एका जिना समर्थकाला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याने त्याच्या कार्यलयात जिनांचा फोटो लावला होता. याचबरोबर देशद्रोहाच्या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला आहे. जालेमधून लढण्यासाठी मी संयुक्त जनता दल सोडले होते. पक्षाने मोठी क्रूर थट्टा केली आहे.

ऋषी मिश्रा यांनी बिहारचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन झा यांनाही लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवारांची नावे निश्चित केली असे, मदन झा सांगतात. काँग्रेस हा गांधींच्या विचाराने चालणारा पक्ष आहे, त्यामुळे त्याला जिनांच्या विचाराने चालणारा पक्ष बनवू नका. गांधींच्या देशात आपण जिनांचा फोटो ठेवू शकत नाही. यामुळे पक्षाचीच प्रतिमा खराब होत आहे. उस्मानी यांना तिकीट दिल्याबद्दल झा आणि सोनिया गांधी यांनी खुलासा करायला हवा. याचबरोबर या मुद्द्यावर झा यांनी राजीनामा द्यायला हवा. 

याआधी ऋषी मिश्रा यांनी २०१५ मध्ये जाले मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा भाजपच्या जिबेश कुमार यांनी पराभव केला होता. त्याआधी झालेल्या पोटनिवडणुकीत ऋषी यांनी तेथे विजय मिळवला होता.  

Bihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात​

कोण आहे उस्मानी?

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या उस्मानी यांच्या उमेदवारीने बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. उस्मानी हे दरभंगा जिल्ह्यातील आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि नागरिक नोंदणी सूची (एनआरसी) यांच्याविरोधातील आंदोलनात ते अग्रभागी होते. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्टु़डंट्स युनियनच्या अध्यक्षपदी त्यांची डिसेंबर २०१७ मध्ये निवड झाली होती. त्यांनी अजयसिंह यांचा ६ हजार ७१९ मतांनी पराभव केला होता. 

उस्मामी यांच्यावर २०१९ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर सफूरा झरगर आणि मीरन हैदर यांच्या अटकेबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा ठपका ठेवत ट्विटरने त्यांचे अकाउंट तात्पुरते बंद केले होते.

LPG सिलिंडर डिलिवरीच्या नियमात 1 नोव्हेंबरपासून महत्त्वपूर्ण बदल​

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)