नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना तेजस्वींनी दिला सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रादजचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा देताना त्यांनी सल्लाही दिला आहे.

पाटणा - बिहारच्या राजभवनात नितीश कुमार यांच्यासह 15 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रादजचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा देताना त्यांनी सल्लाही दिला आहे.

तेजस्वी यादव यांनी ट्विट करताना मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशी आशा व्यक्त केली आहे. तेजस्वी यांनी म्हटलं की, माननीय नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन, आशा आहे की, खुर्चीच्या महत्त्वकांक्षेऐवजी त्यांनी बिहारच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. एनडीएने 19 लाख नोकऱ्या, रोजगार, शिक्षण, औषध, सिंचन यांसारख्या दिलेल्या या आश्वासनांना पूर्ण करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावं.

हे वाचा - 7 दिवसांचा मुख्यमंत्री, दोनवेळा राजीनामा; असा होता नितीश कुमार यांचा आतापर्यंतचा प्रवास

बिहारच्या निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी राज्यात सर्वाधिक जागा राजदने जिंकल्या. मात्र राजदच्या सहकारी पक्षांना अपयश आल्यानं सत्तेपासून दूर रहावं लागलं. तरीही महाआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली करत होती. मात्र नितीश कुमार आणि भाजप यांच्या रणनितीपुढे त्यांना हार मानावी लागली. आज नितीश कुमार यांच्यासह 15 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्री पदाचा पत्ता कट झाला असून त्यांच्याऐवजी तारकिशोर प्रसाद आणि रेणु देवी यांची वर्णी लागली आहे. दोघांनी शपथ घेतल्यानंतर व्यासपीठावरच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशेजारी बसण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री दिसणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election 2020 tejaswi yadav congratulate bihar cm nitish kumar